
सदोष मतदार याद्यांसह निवडणूक म्हणजे फार्स आणि तमाशा असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. ते गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी निवडणूक हा भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याची आणि सत्य ऐकायला, पहायला तयार नसल्याची टीकाही केली. तसेच भाजप आणि दोन बगलबच्चे पक्ष घोटाळे करण्याची फॅक्टरी असल्याचेही ते म्हणाले.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सलग दोन दिवस मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणूक मतदार याद्यांमध्ये जो घोळ आणि घोटाळे आहेत त्या संदर्भात दोन दिवस निवडणूक आयोगासोबत चर्चा झाली. निवडणूक याद्याच जर गुन्हेगारी स्वरुपाच्या, फ्रॉड आणि सदोष असतील तर त्या निवडणुकीला अर्थ काय? लोकशाहीमध्ये एक-एक मत महत्त्वाचे आहे. ते मतच चुकीच्या पद्धतीने जाणार असेल तर निवडणुकीला अर्थ काय? अशी स्पष्ट भूमिका सर्व नेत्यांनी उदारहणांसह मांडली.
भाजप आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष निवडणूक याद्यांमध्ये 24 तास बसून घोटाळे करत आहेत. निवडणूक यंत्रणेमध्ये आणि याद्यांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था… राहुल गांधी यांच्यासह आम्ही सगळे त्याच्यावर आवाज उठवतोय, पण निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही, सत्य पहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतो त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही. अशावेळेला जर भूमिका असेल की आधी निवडणूक याद्या दुरुस्त करा, निर्दोष करा, मग निवडणुका घ्या यात काही चुकते असे वाटत नाही. अशा निवडणुका फार्स आणि तमाशा ठरेल, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोग ही भाजपची एबीव्हीपी, आरएसएस प्रमाणे विस्तारित शाखा आहे. निवडणूक आयोगात नेमलेली माणसं ही भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असतील तर त्यांच्याकडून आम्ही कोणती अपेक्षा करणार? पण त्यांच्यासमोर सत्य मांडणं, कोणत्या प्रकारे गुन्हेगारी स्वरुपाचे काम निवडणूक याद्यांच्या माध्यमातून सुरू आहे हे लोकांना दाखवणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही जनतेचा दबाव आणत राहू. सदोष निवडणूक मतदार याद्या नंतर निवडणूक. ‘पहले मंदिर, फिर सरकार‘ ही शिवसेनेची घोषणा होती आणि ती पूर्ण होती. तसे आधी निर्दोष निवडणूक याद्या, मग निवडणुका ही आमची घोषणा आहे.
त्रुटी आहेत तर निवडणुका का घेता? इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा – उद्धव ठाकरे
दरम्यान, याविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार का असे विचारले असता राऊत म्हणाले की, यावरती एक पक्ष निर्णय घेऊ शकणार नाही. काल आपण पाहिले, सत्ताधारी वगळता महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले. आम्ही त्यांनाही आमंत्रित केले होते. पण ते आले नाहीत. कारण हे चोरांचे सरदार आहेत, आणि निवडणूक आयोगात चोर आहे. त्यामुळे हा निर्णय सामूदायिक पद्धतीने घ्यावा लागेल.