
ईव्हीएमवर विश्वास ठेवता येणार नाही, बॅलेट पेपवरवरच निवडणुका घेतल्या पाहिजेत तरच निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवता येईल, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. याचा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी एक्स अकाऊंटवर शेअर केला. दिल्लीत माध्यमांशी बोलतानाही राऊत यांनी यावर परखड मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.
मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील एलन मस्क या दोघांनीही याआधी सुद्धा या प्रकारचे मत मांडले की, बॅलेट पेपरवर होणार्या निवडणुकांवर विश्वास ठेवावा लागेल, ईव्हीएमवर विश्वास ठेवता येणार नाही. ट्रम्प म्हणतात मी जगभरातील या क्षेत्रातील अनेकांशी चर्चा केल्यानंतर माझे हे मत झाले. प्रे. ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू महाराज आहेत. गुरू महाराज म्हणताहेत की, बॅलेट पेपवरवरच निवडणुका घेतल्या पाहिजेत तरच निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवता येईल. भारतामध्ये आम्ही वेगळे काय सांगत आहोत?
सत्तेवर येण्याआधी भारतीय जनता पक्षही तेच सांगत होता. पण भाजपला ईव्हीएममधून विजयाची गुरुकिल्ली सापडली. देशभराील प्रत्येक निवडणुका तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकू लागल्यावर तुम्हाला ईव्हीएम प्रिय आहे. ईव्हीएमचा विषय आम्ही काढलेला नाही, हा विषय डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेला आहे. त्याच्यामुळे भाजपने आम्हाला उत्तर देण्याऐवजी या विषयावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करावी, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
सुप्रीम कोर्टाने बॅलेट पेपवर निवडणुका घेता येणार नाही, असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्ट हे भाजपचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आहेत. हाय कोर्टातील बरेचसे न्यायाधीश हे भाजपचे कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांप्रमाणे काम करतात. तुम्ही त्यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार. सुप्रीम कोर्टाने टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय दिला तेव्हा प्रे. ट्रम्पने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना मूर्ख म्हटले. पण मी इकडल्या न्यायाधीशांना तसे म्हणणार नाही.
दरम्यान, गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी दिल्लीतील एडविन लुटियंस यांचा पुतळा हटवण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. याबाबत विचारले राऊत म्हणाले की, मग तुम्ही प्रे. ट्रम्प यांचे गुलाम का बनला? दुसऱ्या देशाची करार का करता? राफेल दुसऱ्या देशाकडून विकत का घेतात? अदानीला घेऊन विदेशात का फिरता? गुलामीचा तिरस्कार वाटत असेल तर ट्रेड डील रत्त करा, ज्यामुळे हिंदुस्थान प्रे. ट्रम्प यांचा गुलाम झाला. त्यानंतर लुटियंसबाबत बोलू, असे राऊत म्हणाले.





























































