बाळासाहेब असताना किरीट सोमय्या EVM हॅकर्सला घेऊन सेना भवनात आले, प्रात्यक्षिक दाखवलं अन्… संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

मतदार याद्यांतील घोटाळा, ईव्हीएम हॅक, फेरतपासणीच्या नावाखाली मतदार याद्यातून हटवण्यात येणारे नावे यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना आणि निवडणूक आयोगाला सळो की पळो करून सोडले आहे. मतचोरीच्या मुद्द्यावरून सोमवारी इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चाही काढला. याच दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. बाळासाहेब असताना भाजप नेते किरीट सोमय्या हॅकर्सला घेऊन ईव्हीएम कसे हॅक होते याचा प्रात्यक्षिक दाखवायला शिवसेना भवनात आले होते, असे राऊत दिल्लीत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

युती होती तेव्हा भाजपच्या एका नेत्यानेच ईव्हीएम हॅक कसे करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक आपल्याला दाखवले होते, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच्या पुढे जाऊन आता हा नेता नेमका कोण हे संजय राऊत यांनी सांगितले. हॅकर्सला घेऊन आलेले ते भाजप नेते किरीट सोमय्या होते आणि त्यांनी मशीन हॅक करून आपणही जिंकू शकतो असे म्हणले. मात्र अशा प्रकारे जिंकण्याची आपल्याला गरज नाही. लोक आपल्याबरोबर आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठणकावून सांगितले. त्यावेळी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही हयात होते. त्यांनीही ते प्रेझेंटेशन पाहिले होते, असे राऊत म्हणाले.

ओडिशामध्ये बिजू जनता दलाचा आणि अन्य दोन मोठ्या राज्यात काँग्रेसचा विजय झाला तेव्हा भाजपने ईव्हीएम मशीनवर खापर फोडून ते हॅक झाल्याचा आरोप केला होता. यासाठी मुलुंडचे महाशय किरीट सोमय्या हॅकर्सला घेऊन शिवसेना भवनात आले. त्यांनी वेगवेगळ्या राज्यातून आणलेल्या मशीनवर आम्हाला ईव्हीएम हॅकिंगचे प्रात्यक्षिक दाखवले. यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहेत? असा सवाल करत राऊत म्हणाले की, तुम्ही अशा हॅकर्सचा उपयोग करून घेता आणि आम्ही त्यांना उडवून लावतो. आम्ही चुकीचे काम करणार नाही. हीच आमची आजही भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

भाजप नेत्याने ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक दाखवले होते, उद्धव ठाकरे यांचा हल्ला

दरम्यान, पालकमंत्रीपदावरून मतभेद असतानाच आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रायगडमध्ये आदिती तटकरे, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन झेंडा फडकावणार आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, आम्हाला यात पडायचे नाही. कुणाला पाकलमंत्री करायचे आणि कुणाच्या हातून ध्वजारोहण करायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. स्वातंत्र्य दिनाचा हा एक औपचारिक कार्यक्रम असतो. पण यामुळे शिंदे गटाची दिल्लीत आणि महाराष्ट्रात काय लायकी आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले.

मधल्या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहांची चर्चा केली. त्यात पालकमंत्रीपदाचा विषयही त्यांनी काढला. देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमत नाहीत, असे शिंदे म्हणाले. तेव्हा अमित शहांनी सांगितले की, पालकमंत्रीपदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही. पालकमंत्रीपदी कुणाला नेमायचे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतात. याबाबत मी त्यांना सूचना देऊ शकत नाही. देशाचे गृहमंत्रालय पालकमंत्रीपदी कुणी बसावे हे सांगण्यासाठी नाही. हे अमित शहांनी मिंधेंच्या तोंडावर सांगितले, असेही राऊत म्हणाले.

मंत्री गोगावलेंचे स्वप्न पुन्हा भंगले; रायगडमध्ये आदिती तटकरे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करणार