
भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून छळ छावणी आहे. हिटलरने जसे आपल्या विरोधकांसाठी छळ छावण्या उभ्या केल्या तशा प्रकारच्या छळ छावण्या भाजपने उभ्या केल्या आणि त्याचे बळी अजित पवार आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना केला.
सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एखाद्याला जगणं नकोसं होईल इतके आरोप करू नका, असे विधान केले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जीव नकोसा होईल आणि तो इतका नकोसा करायचा की शेवटी तो आपला पक्ष सोडून तुमच्या पक्षात जाईल. हे अजितदादा पवारांच्या बाबतीत झालेले आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेले आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक हे काय मनापासून भाजपच्या वळचणीला गेलेले नाहीत. हे आपली कातडी, संपत्ती आणि तुरुंगवास वाचवायला भाजपात गेले.
स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी चक्की पिसिंग… चक्की पिसिंग.. हे विधान कुणाविषयी केलेले? अजित पवार यांच्याबाबत केले होते ना? भाजपच्या लोकांमुळे त्यांचा जीव मेटाकुटीला आला. भाजप हा पक्ष नसून छळछावणी आहे. जसे हिटलरने आपल्या विरोधकांसाठी छळ छावण्या उभ्या केल्या तशा प्रकारच्या छळ छावण्या भाजपने उभ्या केल्या आणि त्याचे बळी हे अजित पवार आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
एखाद्याला जगणं नकोसं होईल इतके आरोप करू नका! अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांची आदरांजली
अजित पवार हे महाराष्ट्राला न मिळालेले मुख्यमंत्री असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, त्यांच मुख्यमंत्र्याला तुम्ही तुरुंगात टाकायला निघाला होतात ना? भविष्यात अजित पवार हे महाविकास आघाडीकडूनच मुख्यमंत्री झाले असते. छगन भुजबळ, गणेश नाईकांसारखा नेता झाला. नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला, परत मुख्यमंत्री झाले का? त्यांना मुख्यमंत्री पद फक्त शिवसेना देऊ शकली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पुन्हा होऊन दाखवावे. भाजप त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही. जोपर्यंत त्यांचा गट स्वतंत्र आहे, तोपर्यंत त्यांना अजिबात संधी मिळणार नाही. त्यांना भाजपात विलिन व्हावे लागेल, काही काळ काढावा लागेल आणि मग कदाचित त्यांना नव्याने उमेदवारी करावी लागेल, असेही राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना झालेल्या मारहाणीवरही भाष्य केले. विधानसभा अधिवेशन सुरू असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलेला असताना पुण्यातल्या भर रस्त्यावर वृत्तपत्राच्या कार्यालयाखाली एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रवक्ते हनुमंत पवार यांना ज्या पद्धतीने बंदुक दाखवून धमक्या दिल्या जातात, मारहाण केले जाते, हे दुसऱ्या राज्यात भाजप व्यतिरिक्त पक्षाकडून घडले असते तर काय झाले असते. पण महाराष्ट्रात हे खुलेआम चालले आहे. कुणीतरी गळ्यात काहीतरी उपरणी घालतात आणि हिंदुत्वाच्या नावाने हे चालू आहे. लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. तुम्हाला विचारून आम्ही काय बोलावे हे ठरत नाही ना. जर फडणवीस, मोदी, शहा यांना थोडी जरी लोकशाहीची चाड असेल तर त्यांनी स्वत: या विषयात लक्ष घातले पाहिजे, असे राऊत म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे व त्यांच्या साथीदारांनी मित्रमंडळ चौक परिसरात बेदम मारहाण केल्याची घटना घडली. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/kmw2AgfPia
— Saamana Online (@SaamanaOnline) February 24, 2026





























































