पुढच्या महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. यावेळचे पगारही सरकारने ओव्हरड्राफ्ट घेऊन दिलेले आहेत. पंतप्रधान मोदी आले आणि लाखो कोटींच्या योजनांची घोषणा करून गेले, पण पैसा कुठून आणणार? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला.
लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायलाही सरकारकडे पैसे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेशची माहिती घ्यावी. तिथे लाडकी बहीण योजना बंद पडलेली आहे. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारे योजना चालवता येणार नाही असा अहवाल अर्थखात्याच्या सचिवाने दिला आहे. महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेचा दुसरा किंवा तिसरा हप्ता मिळेल, पण चौथा हप्ता देण्याची ताकद सरकारमध्ये नाही. तिजोरीत खडखडाट असून सरकारी कर्मचारी, पोलीस, शिक्षकांचेही पगार होणार नाहीत. ओव्हरड्राफ्ट अर्थात कर्जावर सरकार चालले आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, योजना घेऊन हवेत उडणाऱ्या एकनाथ शिदेंनी जमिनीवर काय परिस्थिती आहे ते पहावे. लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी मोदी येतात, पण बहिणी कुठे आहेत? खुर्च्या रिकाम्या असून बहिणींनाही हा दोन-तीन महिन्यांचा खेळ असल्याचे माहिती आहे. हे सरकार राहणार नाही, मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मतं मिळवायाच प्रयत्न सुरू आहे. इथे यांचे लाडके बेरोजगार, लाडके शेतकरी, लाडके सरकारी कर्मचारी, लाडके पोलीस नाहीत, आहेत फक्त लाडके ठेकेदार आणि लाडकी बहीण. सरकारला कोणतीही निती आणि दिशा, धोरण नाही. लाडक्या बहिणींच्या राजकीय खेळामध्ये उर्वरित महाराष्ट्राची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आम्हाला वाटतेय.
ठेकेदारांनाही त्यांच्या कामाचे पैसे मिळत नाही. 50-50 हजार कोटींची देणी थकलेली असून उधारीवर कामं चालू आहेत. लहान-मोठे ठेकेदार मंत्रालयात बसून आहेत. कामाच्या बदल्यात त्यांच्याकडून 40 टक्के कमिशन घेतलेले आहे, पण त्यांची बिलं अद्याप मिळालेली नाही. स्वत: मुख्यमंत्री मिस्टर 40 परसेन्ट, त्यांचे चिरंजीव 20 परसेन्ट आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10 परसेन्ट आहेत. ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टरकडून हे आधीच वसूल केले जातात. त्यामुळ ठेकेदार कंगाल झाले आहेत, असेही राऊत म्हणाले.
लवकरच मोठ्या प्रमाणात इनकमिंग
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. काल डोंबिवलीतले तरुण कार्यकर्ते जे एका विशिष्ट परिस्थितीत मिंधे गटात गेले होते ते पुन्हा त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत आले. जळगाव, धुळे, मालेगाव, नाशिक भागातूनही लवकरच मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल. हे सगळे लोक शिवसेनेबरोबर उद्याच्या विधानसभेत काम करतील आणि आमच्या जागा निवडून आणण्यासाठी मदत करतील, असेही राऊत म्हणाले.
हा तर शुभ शकून
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावरही राऊत यांनी भाष्य केले. हर्षवर्धन पाटील यांचे महाविकास आघाडीत येणे हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकून आहे. हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे. ज्या दिवशी आचारसंहिता लागेल, त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतो हे तुम्हाला दिसेल, असेही राऊत ठामपणे म्हणाले.