मोदींना 350 जागा मिळतील असा सर्व्हे आलेला, त्याचं पुढं काय झालं? विधानसभेच्या सर्व्हेवरून संजय राऊत यांचा टोला

लोकसभेप्रमाणे आता विधानसभेआधीही सर्व्हे करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नुकत्याच एका सर्व्हेमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा दावा करण्यात आला. या सर्व्हेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आणि लोकसभेला मोदींना 350 जागा मिळतील असा सर्व्हे आलेला, त्याचं पुढं काय झालं? असा सवालही केला. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हा ब्रह्मदेवाचा सर्व्हे आहे का? या लोकांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना 350 जागा मिळतील असा सर्व्हे दिला होता. तर महाराष्ट्रात 40 हून अधिक जागा मिळतील असे म्हटले होते. पण पुढे या सर्व्हेचे काय झाले? असा टोला राऊत यांनी लगावला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत 175 ते 180 जागा 100 टक्के जिंकणार. त्यामुळे अशा सर्व्हेवरती विश्वास ठेऊ नका. हे सर्व्हे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार असतो. या दृष्टीने काम सुरू झाले, याचाच अर्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी पराभूत होत आहेत, असा ठाम विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक उशिरा घेण्यामागील कारणही राऊत यांनी सांगितले.

मोदींनी वन नेशन, वन इलेक्शनचा नारा दिला. त्याप्रमाणे महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा आणि जम्मू-कश्मीर या चार राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या. पण त्यांनी त्या घेतल्या नाहीत आणि महाराष्ट्र, झारखंडला दूर ठेवले. कारण झारखंडमध्ये त्यांना निवडणुकीपूर्वी गडबड करायची असून पक्ष फोडून सोरेन यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तर महाराष्ट्रात मतांसाठी तिजोरी रिकामी करायची आहे. म्हणून या दोन राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, असा दावाही राऊत यांनी केला.

नागपूर जिल्ह्यात शिवसेना 2 जागा लढवणार, तिसऱ्याचीही चाचपणी

रामटेक हा शिवसेनेचा मतदारसंघ, लोकसभेला आम्ही तो काँग्रेसला दिला. काँग्रेसची ती जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काँग्रेसची विदर्भात एक जागा वाढली. त्याप्रमाणे अमरावतीची जागाही आमचीच होती, ती देखील आम्ही काँग्रेसला दिली. अशावेळी विदर्भात विधानसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व असावे ही आमची भूमिका आहे. त्याप्रमाणे नागपूर शहरात महानगरपालिका हद्दीत आम्ही जागा लढवू. नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचे काम चालू असून रामटेक विधानसभाही आमच्या हक्काचा मतदारसंघ आहे. याशिवाय एखादा मतदारसंघ घेऊ शकतो का याचीही चाचपणी सुरू असल्याचे राऊत स्पष्ट म्हणाले.

दीड हजार प्लस धमकी बोनस

लाडकी बहीण योजना कार्यक्रमाला आला नाही तर फॉर्म रद्द करू अशा धमक्या दिल्याचा आरोप होत आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. हा आरोप नसून सत्य आहे. कार्यक्रमाला आला नाही तर महिलांना धमक्या दिल्या जात आहेत. दीड हजार प्लस धमकी हा बोनसच म्हणावा लागेल, असा टोलाही राऊत यांनी मिंधे सरकारला लगावला.

Ajit Pawar news – अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला भाजप नेत्यांनी दाखवले काळे झेंडे; महायुतीत चाललंय काय?

जोर, जबरदस्ती, धमक्या आणि खोके याचा हा संगम

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी नाईलाजाने त्यांच्यासोबत गेल्याचे विधान केले. यावर बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवारांसह आम्हाला सोडून गेलेल्या आमदारांच्या बाबतीतही हेच आहे. ईडी, सीबीआय, आयटी, पोलीस यांनी दाखल केलेले खटले आणि तपास यंत्रणांवर असलेल्या मोदी-शहांचा दबाव यातून आमदार फुटले. स्वत: एकनाथ शिंदे यांच्यावर खटले टाकण्याची आणि त्यांना अटक करण्याची धमकी होती. त्यांच्या पीएला अटक केली होती. या सगळ्यातून हे सरकार बनले असून जोर, जबरदस्ती, धमक्या आणि खोके याचा हा संगम असल्याची जळजळीत टीका राऊत यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)