
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. आमची चर्चा सुरू असून मुंबई हे टार्गेट आहे. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यापार मंडळींच्या ताब्यात मुंबई सोपवायची नाही. मुंबई मराठी माणसाकडेच राहील हे आमचे टार्गेट आहे, असे संजय राऊत शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच मुंबईतून मराठी माणसाचा आहे तो टक्काही कमी करायचा आणि निवडणुका जिंकायच्या हे मोदी, शहा, फडणवीस यांचे कारस्थान आहे, असा आरोपही त्यांनी केला.
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. नाशिकमध्ये येत्या काही दिवसात मोर्चा निघणार आहे. नाशिकमध्ये ड्रग्जची बजबजपुरी माजली आहे. कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे. तिथे शिवसेना-मनसे एकत्र येऊन विराट मोर्चा काढणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
बेस्टच्या पतपेढी निवडणुकीची जबाबदारी भाजपने प्रसाद लाड यांच्यावर दिली आहे. याचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे कंत्राट ज्यांच्याकडे होते आणि ज्यांनी त्यांच्या पगाराचे पैसे लुटले, ते आता पतपेढी लुटायला निघाले आहेत. काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नये यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत. ते सातत्याने मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पतपेढीवर शिवसेना-मनसे एकत्र येऊन लढत आहे, त्याचा नक्की परिणाम दिसेल, असेही राऊत म्हणाले.
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद आहे. एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटणे बंद केले तर कार्यकर्तेही निघून जातील, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे. एकनाथ शिंदे काही नेते नाहीत. ते ठाण्याचेही नेते नाहीत. कोपरी-पाचपाखाडी, टेंभी नाक्याचेही नेते नाहीत. ज्या दिवशी ईडी त्यांचे पैसे जप्त करेल, त्यांच्या संपत्तीवर टाच आणेल, त्या क्षणी ते एकटे राहतील.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ’ठाकरे ब्रॅण्ड’च सरस ठरणार; शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांचा विजयाचा निर्धार
राज ठाकरे अत्यंत योग्य बोलले. पैसे वाटून राजकारण फार काळ चालत नाही. या देशात अनेकांनी पैसे वाटले, पैशाचे राजकारण अनेकांनी केले. पण प्रदीर्घ काळ चालले नाही. मोदी, शहा, फडणवीस यांचे राजकारण पैशाचे आहे, पण त्यापेक्षाही जास्त पैशांचे वाटप एकनाथ शिंदे करतात. त्यांच्याकडे जे लोक आहेत ते गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. जोपर्यंत गुळाची ढेप गोड लागते तोपर्यंत मुंगळे त्यांना चिकटून राहतील, असेही राऊत म्हणाले.
आमच्या नादाला लागू नका!
यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांचाही समाचार घेतला. एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, गिरीश महाजन म्हणजे महर्षि व्यास नाहीत. स्वत:च्या खाली काय जळतेय हे त्यांनी पहावे. ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची अवस्था काय असेल आणि ते कुठे असेल याचा विचार त्यांनी करावा. तोंडाच्या वाफा कोण दवडतंय आणि कोण नाही हे ठाकरे बंधु राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यावर कळेल. फडणवीस यांच्या सभोवती जे चोर, लफंगे, दरोडेखोर आहेत त्यांचे रस्त्यावर फिरणे अवघड होईल. आज तुमची जी मस्ती आहे, ती लुटलेल्या पैशाची आहे. सत्तेची मस्ती आहे. तुम्ही म्हणजे प्रमोद महाजन नाहीत, तुम्ही जामनेरचे गिरीश महाजन आहात. आपण कोण आहोत, आपले काय धंदे आहेत याचा आत्मचिंतन करा, मग ठाकरे कुटुंबावर बोला. आपल्या नादाला लागू नका. सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात, असेही राऊत म्हणाले.