
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची प्रक्रीया सध्या पूर्णपणे थांबली आणि संपलीय. विलीनीकरण व्हावे ही अजित पवारांची इच्छा होती मात्र आता त्यांच्यानंतर त्यांच्या गटातील एकाही नेत्याची तशी इच्छा दिसून येत नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
”त्यांच्या पक्षात काल काय होणार होतं ते मला माहित नाही. पण आज काय होतंय ते माहित आहे. एकत्र होण्याची प्रक्रिया थांबली आणि संपलीय हे मला माहित आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या प्रक्रियेनंतर अजित दादा भाजपच्या जाळ्यातून बाहेर येणार होते, ते भाजपची साथ सोडणार होते. राष्ट्रवादी एकत्र यावी ही अजित दादांची इच्छा होती. पण आता तशी इच्छा असलेली व्यक्ती त्यांच्या पक्षात दिसत नाही. अजित दादांना भाजपच्या पकडीतून बाहेर पडायचं होतं. भाजप हा खोटा आणि ढोंग्याचा पक्ष आहे. त्यांनी मित्रांनाही फसवलं. खटले काढून घेऊ सांगितलं पण खटले कायम ठेवून त्यात वाढ केली, असे संजय राऊत म्हणाले.
… भाजपने मुंबईकरांना दिलेली भेट
विकास प्रकल्प निधीच्या नावाखाली पालिकेच्या तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा घाट भाजपने घातला आहे. ”भाजपने मोडित काढलेल्या ठेवी म्हणजे भाजपने पहिल्याच अर्थसंकल्पात मुंबईकरांना दिलेली भेट आहे.पालिकेच्या ठेवी या आपत्कालिन परिस्थितीतच काढायच्या असतात. अशी कोणती आपातकालिन स्थिती आली आहे. याचा अर्थ गेल्या चार वर्षात प्रशासकीय काळात मुंबई महानगर पालिकेची लूट झाली. त्यातला वाटा सरकारला मिळाला. आता तुमच्याकडे विकासाला पैसा नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्या ठेवी ठेवल्या होत्या त्यावर तुम्ही दरोडा घालताय. तुमचं सरकार आहे ना मग देवेंद्र फडणवीस 36 हजार कोटी देऊ शकत नाही, असे संजय राऊत म्हणाले.





























































