
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र आले. त्याचा आनंद अवघ्या महाराष्ट्राला झाला. पण केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन चालणार नाही तर त्यांच्यासोबत मराठी माणसांसाठी काम करणारे सगळे पक्ष आणि संघटनांनी एकत्र यायला हवे, तरच महाराष्ट्रावर मराठी माणसाचा हक्क राहील, महाराष्ट्राचे राजकारण मराठी माणसाच्या हातात राहील, असे प्रतिपादन शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी अख्खा देश उद्योगपतींना विकला. लाडक्या अदानीला मुंबई आंदण दिली. हे लोण आता नवी मुंबई, तिसऱया मुंबईपर्यंत आले आहे सावध रहा… शेतकरी आणि कामगार टिकवला तरच महाराष्ट्र हातात राहील. हिंदीचे अतिक्रमण आणि उपऱयांचे आक्रमण रोखण्यासाठी मराठी माणसाची भक्कम वज्रमूठ वळुया, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.
खांदा कॉलनीतील सभा महायुतीला खांदा देईल – शशिकांत शिंदे
खांदा कॉलनीत झालेली ही सभा महायुतीला खांदा देईल असा आज संकल्प करूया, असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. शेकापच्या वर्धापन दिनी होणारा हा कार्यक्रम म्हणजे निष्ठsचा आणि निष्ठावंतांचा सोहळा आहे. हा सोहळा कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रासाठी घेतलेली भूमिका महत्त्वाची – जयंत पाटील
ठाकरे बंधूंनी घेतलेली भूमिका महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन शेकाप नेते जयंत पाटील यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना झाली. त्याची पहिली बैठक प्रबोधनकार ठाकरे यांच्या सूचनेनुसार भाऊसाहेब राऊतांच्या मुंबईतील कोळय़ाच्या वाडीत झाली. आज प्रबोधनकारांचे नातू शेकापच्या वर्धापन दिन सोहळय़ाला उपस्थित राहिले. त्यांनी शेकापच्या गौरवशाली इतिहासाची पाने उलगडली त्याबद्दल मी धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.