
देशाच्या प्रत्येक पंतप्रधानांनी देशासाठी काही ना काही योगदान दिले आहे. पण भारतीय जनता पक्षाने आपल्या राजकीय स्वार्थासाठी गेल्या 10 वर्षांत हा देश धार्मिक होता तो त्यांनी धर्मांध केला. ही धर्मांधता भारतात फूट पाडत आहे आणि ती देशाच्या स्वातंत्र्याला धोका आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. मोदी कोणाचंही नाव घेऊन कोणाला इशारा देत नाहीत. तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही. देशाच्या शत्रूचे खुलेआम नाव घ्या. पंडित नेहरूंचे नाव काय घेता, त्यांनी तर देश घडवला आहे. ट्रम्प बुच मारतोय, रोज देशाला शिव्या घालतोय. तुम्हाला शिव्या घालतोय. ट्रम्पचे नाव घ्यायला घाबरताय कशाला, असे संजय राऊत म्हणाले. काही लोकांना वाटतं 2014मध्ये देश स्वतंत्र झाला. पण 2014नंतर देश खड्डय़ात गेला.
मोदी गांधी टोपी घालून भाषण करतील
स्वदेशीचा जो नारा पंतप्रधानांनी दिलेला आहे हा नारा ही काँग्रेस पक्षाची देणगी आहे. स्वदेशीचा नारा हा या देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरसुद्धा काँग्रेस पक्षाने दिला. ब्रिटिश कापडाची होळी करा आणि स्वदेशी वापरा. त्यातून खादी, गांधी टोपी आली. एक दिवस मोदी गांधी टोपी घालून भाषण करतील. शेवटचा त्यांचा काळ चालू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
2014 नंतर भाजपने धार्मिक देशाला धर्मांध केलं! संजय राऊत यांचा घणाघात
वाचा सविस्तर – https://t.co/E7dUtef14b pic.twitter.com/XQX9gPsmIy— Saamana Online (@SaamanaOnline) August 15, 2025
मोदींनी ट्रम्प आणि चीनला आव्हान द्यावे
पाकिस्तानला इशारा देणे खूप सोपे आहे. पण पाकिस्तानच्या मागे चीन आहे. जनरल मुनीरच्या मागे ट्रम्प आहे, हे मोदी कसे विसरतात. लाल किल्ल्यावरून त्यांनी खोटे भाषण करू नये. मोदींनी ट्रम्पला आव्हान दिले पाहिजे, चीनला दम दिला पाहिजे. पाकिस्तानच्या मागे उभे रहाल तर याद राखा, असे संजय राऊत म्हणाले.