
भाजपच्या मंत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य हे महाराष्ट्राचा आणि मराठी समाजाचा मोठा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र, मराठी माणूस आणि हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत. मात्र भाजपने यापूर्वीही अनेक युगपुरुष पळवण्याचा प्रयत्न केला असून नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, रवींद्रनाथ टागोर यांचाही त्यात समावेश होता. ते प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांना जातीत अडकवू नका. ते विश्वपुरुष होते. आधी अरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण करा आणि मग इतिहासावर बोलण्याचा अधिकार घ्या. पाटीदार समाजाचा मुद्दा काढण्याची गरज काय? हा महाराष्ट्र आणि मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न आहे. कारखाने, जमिनी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पळवल्यानंतर आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांनाच पळवण्याचा उद्योग सुरू आहे. गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्माला आले नाहीत का, म्हणून महाराष्ट्राची दैवतं पळवण्याचा आनंद घेताय का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.





























































