
आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीत जातो. आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीचे राजकारण करतो. लाचार गटासारखे शेपट्या हलवत तुमच्या मागे फिरत नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेले प्रेझेंटेशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या रांगेत बसून पाहिले. यावरून फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला अक्कल शिकवण्याची गरज नाही आणि एवढा पुळका दाखवण्याचे कारण नाही. ज्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडण्याचे पाप केलेले आहे. ज्यांनी मराठी माणसाचे संघटन फोडून तो नजराना अमित शहांच्या पायाशी टाकलेला आहे, त्या लोकांनी आम्हाला स्वाभिमानाच्या गोष्टी सांगू नयेत.
आम्ही स्वाभिमानी आहोत. आमच्या पायावर स्वाभिमानाने उभे आहोत. आम्ही लाचार नाही. आम्ही आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीत जातो. आमच्या अटी-शर्तीवर दिल्लीचे राजकारण करतो. आम्ही कुणाची लाचारी करत नाही हे फडणवीसांना चांगले माहिती आहे. लाचारी करत नाही म्हणून आम्ही भाजपला झिडकारून स्वतंत्रपणे उभे राहिलो, असे राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही आमचा अपमान केला. अमित शहा- देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतली आणि त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आम्हाला लाचारी पत्करायची असती तर आम्ही परत तुमच्यामागे शेपूट हलवत फिरलो असतो, जसे इतर लोक फिरतात.
आम्ही तुमच्याशी लाचारी करायला तयार नाही म्हणून तुम्ही आमचा पक्ष फोडला. तो जो गट आहे लाचारांचा तो शेपट्या हलवत तुमच्या मागे दिल्लीत फिरत आहे. आम्ही त्यातले नाही, मिस्टर फडणवीस. त्यामुळे आम्हाला याबाबतीत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.
हे शपथपत्र मागतायत, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला