
महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या सरकारी पक्षातर्फेच दिल्या जातात. वातावरण तापवून, समजामध्ये विष पसरवून निवडणुकांना सामोरे जायचे, हे भाजपचे राष्ट्रीय धोरण असल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली. दौंडमधील यवत येथे दोन गटामध्ये झालेल्या वादावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले की, लहान लहान घटनांवरून दंग्यांचे भडके उडताहेत. प्रार्थना स्थळांवर हल्ले होताहेत. महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता. पण वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक द्वेष निर्माण करायचा आणि अशा पद्धतीने समाजामध्ये विष पसरवून निवडणुकांना सामोरे जायचे हे फक्त महाराष्ट्रच नव्हते तर देशभरात भाजपचे राष्ट्रीय धोरण आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडताहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातील उद्योगधंदे, रोजगार आणि विकासावर होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री सांगताहेत की गुंतवणूक वाढली. पण दौड हा औद्योगिक पट्टा आहे. तिकडे एमआयडीसी, कारखाने, उद्योग आहेत. बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस काय करताहेत? मंत्री काय करताहेत? कुणाचे राज्य आहे महाराष्ट्रात? असा सवाल करत ही गंभीर बाब असल्याचेही राऊत म्हणाले.
वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना…
सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात, त्याची माणसं नोंद ठेवतात, असे अजब विधान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. या विधानाचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. वाकडी कामे करूनच ही माणसं सत्तेवर आलेली आहेत. हे आधी शरद पवार यांच्या पक्षात होते आणि मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रात आम्ही मतांची चोरी बघितली
राहुल गांधी मतांच्या चोरीबाबत सांगताहेत, हे महाराष्ट्रात देखील झाले आहे. महाराष्ट्रात अशाच प्रकारची वाकडी कामं करून हे सत्तेवर आलेले आहेत. महाराष्ट्रात आम्ही मतांची चोरी बघितली आहे. आमचा अनुभव मोठा आहे. फडणवीस सरकारही मतांची चोरी करूनच आले आहे. हरयाणामध्येही हेच झाले आणि बिहारमध्येही तसेच करायचा प्रयत्न आहे. राहुल गांधी याविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असेही राऊत म्हणाले.
शेकाप महाराष्ट्राच्या राजकारणातला, चळवळीतला महत्त्वाचा पक्ष
दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला संजय राऊत उपस्थित राहणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, शेकापच्या कार्यक्रमाला सर्वच पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. शेकाप महाराष्ट्राच्या राजकारणातला, चळवळीतला महत्त्वाचा पक्ष आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत आणि कष्टकऱ्यांची आंदोलनं उभारण्याची कामं शेकापने केली. त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्या सारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे. मुंबईचा लढा असेल, बेळगाव कारवार सीमाप्रश्नाचा लढा असेल त्यात शेकापचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे राऊत म्हणाले.