विश्वगुरू! संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिमटा, ‘X’वर मार्मिक पोस्ट केली शेअर

‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास उगाळला. फाळणीपासून पहलगामपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी नेहरू आणि काँग्रेसलाच जबाबदार धरले. ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा असे जगातील कोणत्याही नेत्यांनी आम्हाला सांगितले नव्हते, असे त्यांनी सांगितले. पण यानंतर काही तासातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध आपणच थांबवल्याचा दावा केला. एवढेच नाही तर हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफही लादला. तसेच रशियाकडून तेल व शस्त्रास्त्र खरेदी केल्याबद्दल दंडही ठोठावला. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींना ‘विश्वगुरू’ असे म्हणत चिमटा काढला.

खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून एक मार्मिक पोस्ट शेअर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात एक बॅनर घेतल्याचे दिसत आहे. ‘माझा मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 25 टक्के टॅरिफ लादला. हे पंडित जवाहलाल नेहरू यांच्या धोरणांचे अपयश आहे. मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो’, असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. यासोबत राऊत यांनी ‘विश्वगुरू’ हे एका शब्दाचे कॅप्शन देत पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला.