
राज्यात ऑपरेशन टायगरच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज मिंधे गटाचे ऑपरेशन करत आहेत. मिंधे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स असून तो कधीही कापून टाकला जाईल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केला.
ऑपरेशन टायगर, ऑपरेशन कमळ होईल. पण ऑलरेडी ऑपरेशन रेड्याची शिंग झालेले आहे. राज्यात ऑपरेशन टायगरच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कालच शिवसेनेच्या नव्या संसदेतील कार्यालयाचे उद्घाटन केले. आमचे सगळे खासदार यावेळी उपस्थित होते. खरे तर मिंधे गटाचे नेते चुकीचा आकडा सांगत आहेत. त्यांनी 9 पैकी 9 खासदारांचा आकडा सांगितला पाहिजे. ते कोणत्या गुंगीत आहेत याची वैद्यकीय तपासणी केली पाहिजे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे रोज मिंधे गटाचे ऑपरेशन करत आहेत. रोज त्यांचा अपमान होत आहे. मिंधे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधीही कापून टाकला जाईल. आमचे ऑपरेशन करण्यापेक्षा फडणवीस तुमच्या अपेंडिक्सचे ऑपरेशन करत आहेत त्याची काळजी करा.
महान पंतप्रधानांची अमेरिकेपुढे शरणागती
बेकायदा हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकेने अल-कायदाच्या अतिरेक्यांप्रमाणे हाता-पायात साखळदंड बांधून विमानात ठेवले. अत्यंत अमानुष वागणूक त्यांच्याशी करण्यात आली आणि अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरला उतरले. हिंदुस्थानच्या हद्दीत आल्यावरही अहंकाराने त्यांच्या बेड्या कायम ठेवल्या आणि जगाला हिंदुस्थानची इज्जत दाखवली. हिंदुस्थानसारख्या देशाच्या महान पंतप्रधानांनी अमेरिकेपुढे शरणागती पत्करली. संसदेतही परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेची बाजू घेतली. आता पंतप्रधान ट्रम्प यांची भेट घेणार असून या भेटीत ते हा मुद्दा उपस्थित करणार का? त्यांना जाब विचारण्याची हिंमत आहे का? असा सवाल राऊत यांनी केला.
5 लाख लाडक्या बहिणींना वगळले
गेल्या महिन्याभरात लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. हळूहळू हा आकडा आणखी वाढेल. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि निवडणुकाही संपल्या आहेत. बहिणींनी मतं दिलेली आहेत. तीन महिन्यांचे 1500-1500 त्यांना पोचलेले आहेत. पण आता पैसे नाहीत, त्यामुळे जेवढे ओझे कमी करता येईल तेवढे सरकार करणार, असे राऊत म्हणाले.