
महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱयांकडून हरामाचा पैसा वाटला जात आहे. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱयातला धनुष्यबाण चोरला आहे. पण हा धनुष्यबाण चोरणारे मिंधे आणि अमित शहा हे फार काळ राजकारणात टिकणार नाहीत. या अलिबाबा आणि चाळीस चोरांना घरी बसवून त्यांचा टांगा पलटी करा असे आवाहन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केले.
ठाणे शहरातील लढाई ही निष्ठावंत विरुद्ध बेइमान अशी आहे असे सांगून खासदार राऊत पुढे म्हणाले, शिवसेनेला पहिली सत्ता देणाऱया या शहरात निष्ठsचे बीज जसेच्या तसे आहे. त्यामुळेच आजच्या या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली आहे. शिंदे गटाकडून वृत्तपत्राला देण्यात आलेल्या जाहिरातींचा समाचार संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले, ‘जगणे झाले छान कारण धनुष्यबाण’ अशी जाहिरात मिंधे करत आहेत. मात्र ही जाहिरात तशी नसून ‘जगणे झाले छान कारण तुम्ही चोरलाय आमचा धनुष्यबाण’ अशी आहे असे फटकारे त्यांनी लगावले.
भाजपची भूक ही राक्षसी आहे. ही भूक मला पाहवत नाही, भाजपला सत्तेची माज-मस्ती आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात. पवार म्हणतात, तो माज-मस्ती उतरवायला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले आहेत. त्यामुळे नवे पर्व सुरू झाले असून ते वादळी आहे. हे वादळ नुसते घोंगावत नाही तर तडाखेही देत आहे. या वादळापुढे बेइमान सत्ताधाऱयांची दाणादाण उडणार आहे, असा जबरदस्त विश्वास खासदार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.





























































