
‘गोकुळ’मधील नवनिर्वाचित बहुमताला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी राज्य सरकार तज्ज्ञ व शासकीय स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा अध्यादेश आणणार आहे. हा अध्यादेश राज्यपालांच्या सहिसाठी जाणार आहे. त्यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच जर राज्यपालांना लोकशाहीची, मतदानाची चाड असेल तर ते या अध्यादेशावर सही करणार नाहीत, असे राऊत यांनी म्हटले आहे.
”लोकशाहीची, मतदानाची चाड असेल तर राज्यपाल त्या अध्यादेशावर सही करणार नाही. सध्याच्या राज्यकर्त्यांनी लाज लज्जा, शरम याची फिकीर न करता जनमताचा कौल फेटाळून लावला आहे. आम्ही जे म्हणतो लोकशाही धोक्यात आहे ते यासाठी. देवेंद्र फडणवीस इतक्या खालच्या स्तरावर जातील याची आम्ही कधी कल्पना केली नव्हती. यांच्या वडिलांनी आणिबाणीच्या संघर्षात भाग घेतला असा दावा ते करतात. याबाबत आता मला शंका येऊ लागली आहे. गंगाधरराव फडणवीस हे लोकशाही व स्वातंत्र्यासाठी लढले असतील तर त्यांचे चिरंजीव देवेंद्र लोकशाहीने दिलेला कौल अशाप्रकारे चिरडून टाकू शकत नाही. हा त्यांच्या वडिलांच्या संघर्षांचा वत्याागाचा अपमान ठरेल”, असे संजय राऊत म्हणाले आहे.
”फडणवीस म्हणतात बैठकीसाठी कोरम लागतो. तो कोरम पुरा होऊ नये म्हणून त्यांनी समविचारी मताच्या दोन जागा फिरवल्या. गोकुळमध्ये तेरा सतेज पाटलांच्या पॅनेलला व महाडिकांच्या पॅनेलला १२ मिळाले आहेत. समजा जर निकालानंतर तेरा महाडिकांच्या पॅनेलला असते आणि सतेज पाटलांच्या पॅनेला 12 असते तरी फडणवीसांनी हा निर्णय घेतला असता का? तेव्हा त्यांना बहुमताचा साक्षात्कार झाला असता. यांना पराभव मान्य नाही. शौमिका महाडिक, हसन मुश्रिफांच्या मुलाला लोकांनी पराभूत केलंय. तुम्ही त्यांना शासकीय सदस्य म्हणून आणताय. मला फडणवीसांना एवढंच सांगायचं आहे की त्यांनी आपल्या प्रतिमेला जास्त डागाळू देऊ नये. लोकशाही व कायद्याच्या बाबतीत आधीच त्यांनी आपली प्रतिमा डागाळली आहे. त्यांनी त्यांची प्रतिमा इतकी काळीकुट्ट करू नये की लोकं तुम्हाला भविष्यात ओळखणारच नाहीत. त्यांच्या स्मृतीपटलावरून नष्ट होतील असं काम करू नये”, असे संजय राऊत म्हणाले
”महाराष्ट्राचं गोकुळ गुजरातच्या अमूलच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे. याचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सतेज पाटील यांना निवडून दिले होते. गोकुळची लढाई ही एक महत्त्वाची लढाई आहे. लोकशाहीचा कौल यांना मानावाच लागेल. जर फडणवीस हे जर तो मानत नसतील तर भविष्यात त्यांना याची फार मोठी किंमत मोजावी लागेल”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.































































