
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण देणे टाळल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्लाबोल केला आहे. लोकसभेत खासदारांच्या निदर्शनांमुळे पंतप्रधानांना धोका असल्याचा दावा केला जाणे हास्यास्पद असल्याचे संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी ‘जगातले नंबर एक डरपोक पंतप्रधान’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राजीव गांधी यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधानांनी तीव्र आंदोलनांचा सामना केला. पण त्यांनी कधीही खासदारांपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली नव्हती. 56 इंचाची छाती असल्याचा दावा करणारे पंतप्रधान खासदारांना घाबरून गुडघे टेकून बसले आहेत, अशी खरमरीत टीकाही संजय राऊत यांनी केली.
यावेळी राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करताना म्हटले की, देशाला खरा धोका काँग्रेसपासून नसून मोदी सरकारपासून आहे. नरेंद्र मोदींच्या आधीपासून आम्ही संसदेत आहोत. मोदी दिल्लीत नंतर आले. आम्हाला संसद माहिती आहे, आचारसंहिता माहित आहे आणि नियमही माहित आहेत. धोक्याचा उल्लेख करत मोदींनी भाषण टाळले पण मोदींना कोणापासून धोका आहे, काँग्रेसपासून? ज्या काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलं. बलिदानं दिली, तुरुंगवास भोगला त्यांच्यापासून? आणि त्यातूनच संसद निर्माण झाली. त्या पार्लमेंटमध्ये मोदींना धोका आहे, असे कोणी म्हणत असेल तर ते अत्यंत बकवास आहे. खरं म्हणजे या देशाला जर कोणापासून धोका असेल तर तो मोदी सरकारपासून धोका आहे. काँग्रेस पक्षाने अतिरेकी हल्ल्यात इंदिरा गांधींना गमावले, राजीव गांधींना गमावले. सर्व धोके पत्करून ते जनतेत गेले आणि त्यांच्यावरती हल्ले झाले. मोदी किंवा भाजपचा एखादा नेता असा आहे की ज्याने देशासाठी बलिदान दिले आहे, साहस दाखवलेले आहे? असा संतप्त सवाल यावेळी राऊत यांनी केला.
मोदी सरकारच्या धोरणांमुळे आज कश्मीरपासून मणिपूरपर्यंत निरपराध लोक मारले जात आहेत. असंख्य निरपराध माणसं कश्मीरपासून मणिपूरपर्यंत निरपराध माणसं मारली गेली आणि हे राजकारण करत बसले. मोदींमुळे आता देशाला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने मोदींनी अमेरीकेशी व्यापार करार केला आहे, देशाला गुलामीचा धोका असल्याचे म्हटले आहे. त्याच्यावरती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी बोलायला हवे. खासदार वेलमध्ये उतरले म्हणून पंतप्रधानांना धोका निर्माण होऊ शकतो हे हास्यास्पद विधान आहे. मनमोहनसिंग यांच्यापासून राजीव गांधींपर्यंत पंतप्रधानांपर्यतं एवढे आंदोलन केले नाही. तेव्हा ते म्हणाले नाही आम्हाला खासदारांपासून धोका आहे. हे डरपोक सरकार आहे आणि या देशाचे पंतप्रधान जगातला डरपोक नंबर एक आहे. कसली 56 इंचाची छाती? खासदारांना घाबरता? तुम्ही गुडघे टेकल्याचे राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी दबावाखाली अमेरिकेसोबत व्यापार करार केला आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच ‘एपस्टिन फाईल’मधील संवादाचा संदर्भ देत संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावरही निशाणा साधला. एपस्टिन फाईलमध्ये मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री हरदिप पुरी आणि एपस्टिन याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवरती आलेला आहे तो पाहिल्यावर तुमची खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपस्टिनसोबत नाजूक आणि मधूर संबंध ठेवून होते, ते कशासाठी? हरदीप पुरी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपस्टिनच्या लोकांना हिंदुस्थानात येण्याचा व्हिजा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झाले का? नरेंद्र मोदी यांचा त्यात वारंवार उल्लेख आहे. त्याच्यावर आम्ही बोलणार नाही. त्यावर बोलण्यासाठी राहुल गांधी सक्षम आहेत. पण इतर लोकांची जी नावे येतायतं मोदींच्या आसपासच्या, मंत्रीमंडळातील, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला? जेव्हा बिल गेट्स यांच्या पत्नीला कळलं की बिल गेट्सचे जेफ्रि एपिस्टनसोबत संबंध आहेत आणि जेफ्रि एपिस्टनचा धंदा लहान मुलींना फुस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांकडून त्या मुलींचे शोषण करू देणं. हे जेव्हा बिल गेट्स यांच्या पत्नीला कळलं तेव्हा तिने नवऱ्याकडून घटस्फोट घेतला. ते अत्यंत निर्घृण आहे आणि त्याच पद्धतीचे संशयास्पद वातवरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झाले असताना अजूनही ते मंत्री आणि ती लोकं या देशावर राज्य करतायतं हा फरक समजून घेतला पाहिजे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर बोलताना संजय राऊत यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत 9 फेब्रुवारीला रोहित पवार काही गुपिते उघड करणार असतील तर, महाराष्ट्र ते ऐकण्यास उत्सुक आहे. अजित पवार हे एक उमदे नेते होते आणि त्यांच्या निधनाबाबत व्यक्त होणारा संशय दूर होणे आवश्यक आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा स्तंभ असून त्यांच्या अनुभवापुढे सध्याचे सत्ताधारी ‘ज्युनिअर’ आहेत. शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपत असली तरी, महाविकास आघाडीकडे त्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. पवारांनी पुन्हा निवडणूक लढवावी, अशी महाविकास आघाडीची ठाम इच्छा असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.


























































