फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी अमित शहा एकनाथ शिंदेंना ताकद देतायत – संजय राऊत

भाजप व एकनाथ शिंदे गटातील गेल्या काही दिवसांपासून वाद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपकडून सतत एकनाथ शिंदे गटाला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व एकनाथ शिंदे या दोघांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. ”शिंद्यांकडे जर ताकद असती तर इतके अपमान झाल्यानंतर ते रडत अमित शहांकडे गेले नसते, फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी अमित शहा एकनाथ शिंदेंना ताकद देतायत”, असे संजय राऊत म्हणाले.

”मिंध्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. त्यामुळे मिंध्यांनी अमित शहांच्या पायाशी जाऊन भाजपसोबत युती केली. रविंद्र चव्हाणांसह संपूर्ण भाजपच युनिट हे या सोकॉल्ड महायुतीच्या विरोधात आहे. एकनाथ शिंदेची कुठेच ताकद नाही. त्यांना भाजपच्या जोरावर आपल्या जागा निवडून आणायच्या आहेत. शिंद्यांची जर ताकद असती तर इतके अपमान झाल्यानंतर ते रडत अमित शहांकडे गेले नसते. अमित शहांना देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाहीए त्यामुळे ते एकनाथ शिंदेंना ताकद देत आहेत. त्यांना फडणवीसांना चेकमेट करायचे आहे, त्यांना फडणवीसांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही. त्यामुळे शहांनी एकनाथ शिंदेमध्ये फडणवीसांना गुंतवून ठेवायचे आहे. एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही. त्यांना कुठेही स्थान नाही. अमित शहांच्या टॉनिकवर ते जगतायत. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने त्यांना भीती आहे त्यामुळे मराठी माणसात तुकडा पाडण्यासाठी अमित शहांनी एकनाथ शिंदेना बरोबर घ्या असं सांगितलं आहे. पण महाराष्ट्रातील भाजपचं युनिट एकनाथ शिंदेंच्या विरोधात आहे”, असे संजय राऊत म्हणाले.