
“महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत जय गुजरातचा नारा दिला. आम्ही जे म्हणत आहोत की, महाराष्ट्राला गुजरातला विकायची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यावर या सगळ्यांचे सही-शिक्के आहेत, हे आज स्पष्ट झालं”, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले आहेत की, “आपण राज्याचे मुख्यमंत्री होतो अनिता आता उपमुख्यमंत्री आहोत. याचा विसर त्यांना (एकनाथ शिंदे यांना) पडला आहे. अमित शहा यांच्यामुळे. स्वतःला ते शिवसेनेचे प्रमुख नेते मानतात, मात्र ती शिवसेना नसून त्यांची शहासेना आहे. त्यामुळे त्या शहासेनेच्या संहितेत जाऊन, त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा त्यांच्यासमोर त्यांनी अशा प्रकारची लाचारी पत्करली असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं त्या (एकनाथ शिंदे यांच्या) भूमिकेवर काय मत आहे?”
संजय राऊत म्हणाले की, “गुजरात हा देशाचा एक भाग आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी सांगितलं आहे की, महाराष्ट्रात आम्ही जय महाराष्ट्र म्हणू, पण पंजबाला गेलो तर, तर जय पंजाब म्हणू. तसेच गुजरातला गेलो तर जय गुजरात म्हणू. पण हे महाराष्ट्राचे पहिले मंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीत जय गुजरातचा नारा दिला. आम्ही जे म्हणत आहोत की, महाराष्ट्राला गुजरातला विकायची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यावर या सगळ्यांचे सही-शिक्के आहेत, हे आज स्पष्ट झालं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. गुजरात विषयी आमच्या मनात कोणतीही द्वेषाची भावना किंवा चुकीचे विचार नाहीय. पण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आपल्या मालकासमोर म्हणजेच अमित शहा यांच्यासमोर जय गुजरात म्हणणं, म्हणजे त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे, त्याचा हा उद्घोष आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेना नाही तर ती शहासेना आहे आणि तुम्ही (एकनाथ शिंदे) शहासेनेचे सादर आहात. अमित शहा यांनी नेमलेले, हे आज त्यांनी पुण्यनगरीत जो मराठी माणसाचा बालेकिल्ल आहे, महाराष्ट्राची संस्कृती जिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचे भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे आज, हे दाखवून दिले.”
संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या पोटातले ओठांवर आले. त्यांच्या पक्षाची सुरुवात सुरुतमध्ये झाली आहे. शहासेनेची स्थापना ही सुरतला झाली. त्यांच्या पक्षाचा जन्म सुरतला झाला. त्यामुळे त्यांच्या पोटात जे आहे, ते बाहेर येत आहे. त्यात नवीन काय आहे.”