मला मुख्यमंत्री करा, संपूर्ण गटासह भाजपमध्ये विलीन होतो, दिल्लीत शिंदेंनी शहांच्या पायावर डोके टेकवले; संजय राऊत यांचा दावा

शहा सेनेचे एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिल्लीत जाणारच होते. दिल्लीला जाऊन त्यांनी शहांच्या पायावर डोके टेकवले आणि गुरू म्हणून पूजा केली. मला मुख्यमंत्री करा, संपूर्ण मिंधे गटासह भाजपामध्ये विलीन होतो, अशी ऑफर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसाची एकजूट होत आहे. ती तुटली नाही तर आपल्याला फार अवघड जाईल. हे थांबवण्यासाठी काय पर्याय आहे विचारल्यावर शिंदेंनी, मला मुख्यमंत्री करा. मी हे सर्व थांबवतो अशी ऑफर त्यांना दिली. यावर शहांनी मुख्यमंत्री भाजपचाच राहील असे स्पष्ट केले. त्यावेळी शिंदेंनी, मी संपूर्ण मिंधे गटासह भाजपमध्ये यायला तयार असल्याचे त्यांना सांगितले. यापूर्वीही त्यांनी ही भूमिका मांडली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

दिल्लीभेटीत फडणवीसांची तक्रार

आपल्या दिल्लीभेटीत त्यांनी देवेंद्र फडणवीस आम्हाला काम करू देत नाही. आम्हाला अडचणीत आणत आहे. आमच्या आमदारांच्या चौकश्या लावल्या आहेत अशी तक्रार शिंदे यांनी अमित शहांकडे केल्याचे संजय राऊत म्हणाले.