
उत्तर प्रदेशमध्ये माघ मेळ्यात पवित्र स्नान करण्यापासून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना योगी सरकारने रोखले आहे. त्या विरोधात शंकराचार्य आंदोलन करत असताना त्यांच्यावर पोलिसांना लाठीचार्ज केल्याचे देखील समजते. यावरून सध्या उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच शंकराचार्यांना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्य अतिथीचा दर्जा देत त्यांना वर्षा बंगल्यावर बोलावले होते. आता मात्र भाजपशाशित उत्तर प्रदेशमध्ये शंकराचार्यांवर लाठीचार्ज होऊनही त्याचा शिंदे यांनी निषेध देखील केला नाही. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मिंध्यांवर जोरदार टीका केली आहे.
”ज्योतिष पिठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी योगी सरकारने स्नानाला जाण्यापासून रोखलं. ते आंदोलनाला बसले असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला. स्वामींच्या अंगावर देखील हिंदुत्वाची भगवी वस्त्र आहेत. योगींच्या अंगावर देखील तिच भगवी वस्त्र आहेत. मोदी देखील निवडणूक काळात अशा प्रकारची रंगरंगोटी करत असतात. काही काळापूर्वी शंकराचार्य हे महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी शिंदेनी त्यांना राज्य अतिथीचा दर्जा दिला होता. वर्षा बंगल्यावर बोलवून त्यांचे चरण धुतले. त्यावेळी शिंदेंनी तेच कसे बाळासाहेबांचे वारस आहेत हे वदवून घेतलं. आज त्याच शंकराचार्यांवर पोलीस निर्घृण हल्ला करतायत. एकनाथ शिंदे त्यांच्या गुरुवर हल्ला होत असताना गप्प बसले आहेत. साधा निषेध करण्याची हिंमत नाही. ते घाबरून गप्प बसले आहेत. दुसऱ्या एखाद्या राज्यात अशा प्रकारची घटना घडली असती तर तापलेल्या तव्यावरचा वाटाण उडतो तसे हे शिंदे आणि भाजपवाले तडातडा उडले असते”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”ही तर मुलायम सिंग यांच्यापेक्षाही वरची कारवाई आहे. अयोध्येत मुलायम सिंहांनी केलेली कारवाई तुम्ही विसरलेला नाहीत. पालघरमध्ये हिंदू साधू हत्याकांड विसरलेला नाही. मग हे कसं चालतं? पंतप्रधान मोदींनीही या घटनेचा निषेध करायला हवा होता. शिंद्यांसारख्या त्यांच्या भक्तांनी याचा करायला हवा होता. इतर शंकराचार्यांनी निषेध करायला हवा होता. आता तर म्हणे उत्तर प्रदेश सरकारने त्यांना शंकराचार्य आहेत की नाही म्हणून नोटीस बजावली आहे. जर ते शंकराचार्य नाहीत तर त्यांना अनेक राज्यात राज्य अतिथीचा दर्जा का दिला गेला. ढोंगी लोकं आहेत ही”, असे संजय राऊत म्हणाले.



























































