
”अदानीला पवनहंसचा चारशे एकरचा भूखंड हवा आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील तो भूखंड देखील सत्ताधाऱ्यांनी अदानीला द्यायला काढला आहे. माझे त्यावर लक्ष आहे”, असे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच ”कुणाला घाबरून मुंबई उद्योगपतीच्या घशात घालताय, तुमची पण नावं एपस्टीन फाईलमध्ये आलीयत का? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी केला.
”ही मुंबई मराठी माणसाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने शिवसेना स्थापन करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची ही मुंबई आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने कारभार करू. म्हणजे नक्की काय करू? धारावी विकायला काढू, टोलनाके, मदर डेअरी विकायला काढू. पवनहंस जिथे खासगी विमानांसाठी हेलिपॅड आहे असा केंद्र सरकारच्या अखत्यारितील चारशे एकरचा भूखंड अदानीला हवाय. याबाबत त्याने सरकारला कळवले आहे. ही जागा देखील अदानीला देण्याचा विचार हे लोकं करतायत. हा बाळासाहेबांचा विचार आहेत का? कधी समजून घेतलंय का काय आहेत बाळासाहेबांचे विचार?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
यावेळी ते पुढे ते म्हणाले की, जसं काल राहुल गांधी संसदेत बोलले की यांनी भारतमाता विकायला काढली आहे. तसंच इथे यांनी मुंबादेवीची, मराठी माणसाची मुंबई विकायला काढली आहे. आमचे नगरसेवक विरोधी पक्षात जरी असले तरी फडणवीस, मोदी शहांचा मुंबई विकण्याचा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. माझं लक्ष आहे त्यावर. काल दिल्लीत मी याची सर्व माहिती घेतली. केंद्र सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या एका उद्योगपतीच्या घशात घालताय. का? तुमची पण नावं आलीयत एपस्टीन फाईलमध्ये? म्हणून घाबरून सर्व उद्योगपतींना देताय का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.




























































