हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या बांगलादेशला मोदी सरकारकडून कोट्यवधींची मदत; अर्थसंकल्पावरून संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या आगामी संभाव्य महापौर रितू तावडे यांनी मुंबई बांगलादेशीमुक्त करू असं विधान केलं. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणावर आणि अर्थसंकल्पातील घोषणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. हे अवैध बांगलादेशींना देशाबाहेर घालवायला निघाले आहेत, त्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा. हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या बांगलादेशला मोदी सरकारकडून कोट्यवधींची मदत केली आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महापौरांनी दिल्लीत जायला पाहिजे. देश अवैध बांगलादेशीमुक्त करण्याचे जे काही त्यांचं धोरण आहे, ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणेन. अर्थात घुसखोर बांगलादेशींना मुंबई आणि देशातून हाकलायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना महापौरांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेश विषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये गेल्या एका वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत, त्यात आतापर्यंत आमची साडेचारशे मंदिरं पाडली. हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली. त्यांना जाळून मारलं, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांना गोळ्या घातल्या. त्याबाबत देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री ब्र सुद्धा उच्चारत  नाही, असा घणाघातही त्यांनी केला.

हे महापौर अवैध बांगलादेशींना देशाबाहेर घालवायला निघाले आहेत. त्यांनी देशाच्या अर्थसंकल्पाचा जरा नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हिंदुस्थान सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली आहे. हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग केलं का? हिंदूना मारण्यासाठी पैसे दिलेत. देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कत्तली करणाऱ्या, हिंदूंची मंदिर पाडणाऱ्या, हिंदूंच्या घराघरांना आग लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय, हे मुंबईच्या आगामी महापौरांना समजत आहे काय? असा सवाल करत जे म्हणतोय खोट आहे किंवा नाही ते तरी सांगा. हिंदूंच्या कत्तली करण्यासाठी कोट्यावधी रुपये अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदींनी दिले आहेत. हे जर तुमच्या महापौरांना माहित नसेल तर विनाकारण  हिंदू मुसलमान करू नका, असेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची लवकरच विधानपरिषदेची मुदत संपत आहे. यावर राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत एकमेकांना मदत करावीच लागेल. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि आमची शिवसेना आहे. त्यामुळे यापुढच्या विधानपरिषदांच्या निवडणुकांमध्ये किंवा इतर राज्यसभांच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करावी लागेल. तरच राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये आमचे लोक निवडून येतील. आम्ही सगळ्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केलेली आहे, की आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी विधिमंडळामध्ये पुन्हा जाणं हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक आहे, अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी विधीमंडळात पुन्हा जावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा असल्याचे संजय राऊत म्हणाले.

संघाच्या शाखेत यापुढे मुस्लिमांचे स्वागत करणार का? संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना सवाल