निवडणुका बिनविरोध व्हाव्यात हा अट्टाहास चुकीचा; ज्याला सरकारला मतदान करायचं नाही त्यांच्यावर हा अन्याय! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी आणि बारामतीमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी एकसंघ असून चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे हा अट्टाहास चुकीचा असून ज्याला सरकारला मतदान करायचे नाही त्यांनी काय करायचे? हा त्यांच्यावर अन्याय असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली. राहुरी संदर्भात आज शरद पवार यांच्या पक्षाची बैठक असून काँग्रेस नेत्यांशीही आमचा संवाद सुरू आहे. यात शिवसेनेची भूमिका थोडी कमी आहे. कारण बारामतीची जागा आम्ही लढलो नव्हतो. ती जागा शरद पवारांच्या पक्षाची असून राहुरीची जागाही राष्ट्रवादीचीच आहे.

राहुरीमध्ये आमच्या पक्षाकडून तीन इच्छुक उमेदवार आहेत. राजकारणामध्ये निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्ते पुढे येत असतात. आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यायचा आहे. प्राजक्त तनपुरे तिकडले माजी आमदार असून त्यांनी मागची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली आहे. ते यावेळी निवडणूक लढणार आहेत की नाही यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. पहिली संधी राष्ट्रवादीची आहे, कारण ती त्यांच्या वाट्याला आलेली जागा आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे त्या मतदारसंघात प्राबल्य आहे आणि आमच्याकडे तीन उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक होईल, असेही राऊत म्हणाले.

बारामतीतील पोटनिवडणुकीबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पण त्या भाजपबरोबर निवडणूक लढवत असून त्यांची युती आहे. याच्यावरही आमच्या पक्षामध्ये चर्चा झाली. सुनेत्रा पवार या काही महाविकास आघाडीच्या उमेदवार नाहीत. अशावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केलेली असली तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील असे म्हणत राऊत यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याची चर्चाही फेटाळून लावली.

ते पुढे म्हणाले की, भाजपसंदर्भात महाविकास आघाडीची एक भूमिका आहे. अजित पवारांसारखे नेतृत्व ज्या पद्धतीने काळाने हिरावून नेले. त्याच्यामुळे एक सहानुभूती, आदर, सन्मान आहे. पण निवडणुका लढायच्या नाहीत, बिनविरोध झाल्या पाहिजे हा अट्टाहास चुकीचा आहे. यशवंतराव चव्हाण यांनाही निवडणुकांना सामोरे जावे लागले होते. तुम्ही इतर सगळ्या निवडणुका लढता ना? त्याच्यासाठी मतं फोडतात, आमदार-खासदार फोडतात.

निवडणूक काळामध्ये मतदारांचा एक मोठा वर्ग असतो ज्याला सरकारला मतदान करायचे नसते, त्याने काय करायचे? म्हणजे जे सरकार विरोधी आहेत, कष्टकरी, शेतकरी आहेत. त्यांच्यावर बिनविरोध निवडणुका हा अन्याय आहे. त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्यापासून रोखणे आहे. तरीही या दोन्ही निवडणुकांसंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

बारामतीत निवडणूक बिनविरोध नाही, लढण्यावर काँग्रेस ठाम

काँग्रेस निवडणुका लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आम्हीही तीन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. राजकारणत कधी कुणावर निवडणूक लढण्याची वेळ येईल हे सांगता येत नाही. हे युद्धासारखे असून सदैव तयार राहिले पाहिजे. कुणावर जबाबदारी पडेल सांगता येत नाही. आम्ही स्वत: आमच्या उमेदवारांशी चर्चा केली आहे. हर्षवर्धन सपकाळ जर त्यांचे उमेदवार ठरवून ठेवत असतील ही चांगली गोष्ट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा करत आहे. तीनही पक्ष मिळून आम्ही निर्णय घेऊ, असेही राऊत म्हणाले.