अजित दादा… खूप आठवण येत राहील …; संकर्षण कऱ्हाडेची भावूक पोस्ट

बारामतीमध्ये येत असताना बुधवारी सकाळी विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर गुरुवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं इन्स्टाग्रामवर अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या पोस्टमध्ये संकर्षण कऱ्हाडे याने म्हटले आहे की, मा. अजित पवार सरांचं जाणं फार दुर्दैवी. काही माणसं कोणत्या पक्षाची आहेत, कोणत्या पदावर आहेत यापेक्षा ती महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत राहिली की आधार वाटतो. त्यातले अजितदाद पवार हे तसे आधार वाटायचे. आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटत आहे, खूप त्रास होतोय. गंभीर प्रश्नांवर पण मिश्किल उत्तर देऊन पत्रकार परिषद गप्पांमध्ये बदलायची त्यांची शैली कमाल होती. त्यांच्या पंखाखाली असलेले अनेक कार्यकर्ते आज पोरके झाले ही भावना मी समजू शकतो. अपघातात त्यांच्यासह प्राण गमावलेल्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. अजित दादा.. खूप आठवण येत राहील,’ अशा शब्दांत संकर्षणने भावना व्यक्त केल्या आहेत.