
सर्वांनाच दुःखात देव आठवतो. अरे देवा..! असे शब्द, नकळत बाहेर पडतात. पण, नामस्मरण करायचं म्हटले की मनात अनेक शंका अनेक विकल्प जागे होतात. समर्थ म्हणतात, वारंवार तुम्हाला नामाचा महिमा सांगतो आहे त्याचा वीट- कंटाळा येऊ देऊ नका. खरं पाहता, समर्थ आपल्याला सावध करत आहेत. आत्ता भरभरून सुख मिळते आहे परंतु, शेवटच्या क्षणी यातले काही बरोबर येणार नाही आणि ऐनवेळी पुण्यसंचयही होणार नाही. भक्ती ही अखंड घडणारी प्रक्रिया असावी लागते. संत जनाबाईंच्या अभंगात ही भक्ती कशी दिसते पाहा… ‘दळिता कांडीता, तुज गाईन अनंता, न विसंबे क्षणभरी, तुझे नाम गा मुरारी, नित्य हा ची कारभार, मुखी हरी निरंतर, मायबाप बंधू बहिणी, तू बा सखा चक्रपाणी, लक्ष लागले चरणासी, म्हणे नामयाची दासी’ असं म्हटल्यावर कशाला होईल एकटेपणाची जाणीव? नाम भक्तीसाठी हाती माळ हवीच असे नाही आणि नामाचं गणित मांडायची तर अजिबात गरज नाही! संत सावतामाळी म्हणतात.. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर, अवघा झाला माझा हरी, मोट नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी’ संतांनी आपल्या सहज भक्तीचा अनुभव आपल्या अभंगातून कथन केला आहे. मीरेची भक्ती, तिचं समर्पण, आर्तता तिला अमर करून गेली. भव भयाच्या पार करून गेली. आहे ना नामभक्तीचा महिमा अलौकिक!
– संध्या शहापुरे





























































