
बदलापुरात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात घट्ट धरून जबरदस्ती करण्याची घटना ताजी असतानाच आज सांताक्रुझमध्ये रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीसमोर विचित्र हावभाव केल्याची घटना घडली. काहीतरी काळेबेरे आहे याची जाणीव होताच, या मुलीने रिक्षा सोडली. मात्र रिक्षाचालकाने तिचा बराच वेळ पाठलाग केला. या मुलीने घरी जाऊन ही थरारक घटना पालकांना सांगताच त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भय इथले संपत नाही.
खार येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने ऍपवरून सकाळी 11.30 च्या दरम्यान रिक्षा बुक केली. खार सबवे ओलांडल्यानंतर रिक्षाचालकाने अचानक रिक्षा थांबवली. त्यामुळे ती तरुणी अस्वस्थ झाली. या घटनेने हादरलेल्या अल्पवयीन तरुणीने घर गाठले आणि हा सगळा थरारक प्रसंग तिच्या पालकांना सांगितला. पालकांनी तिला घेऊन तडक वाकोला पोलीस ठाणे गाठले आणि ‘त्या’ रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली.
तपास सुरू
ही रिक्षा ऍपद्वारे बूक करण्यात आल्याने पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीकडून सगळे ‘डिटेल्स’ घेतले. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी सीसी टीव्ही फुटेज तपासले जाईल. त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येणार असल्याचे वाकोला पोलिसांनी सांगितले.


























































