रंगनाटय़ – उपहासात्मक शैलीचे ‘संतोष’ नाटय़

>>राज चिंचणकर

लोकनाटय़, लोकसंगीत याचे प्रतिबिंब दर्शवित, विनोदाचा बाज जपत उपहासात्मक शैलीतून समाजाला संदेश देत बरेच काही साध्य करणारे नाटक

मराठी रंगभूमीच्या दोलायमान काळात विविध प्रकारच्या नाटय़कृती देत आणि नाटकाच्या विविध बाजू सांभाळत युवा रंगकर्मी संतोष पवार याने रंगभूमी सजीव ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य बजावले आहे. ‘लोकनाटय़’ हा खरे तर त्याच्या आवडीचा विषय, परंतु लोकनाटय़ामध्ये रमतानाच त्याने काही वेगळय़ा धाटणीची नाटकेही रंगभूमीवर आणली. कलावंत म्हणून त्याचा मूळ बाज विनोदी प्रकारात मोडत असला तरी त्याच्या नाटकातून खास अशा सामाजिक संदेशांची पेरणी केलेली असतेच. किंबहुना, प्रासंगिक विनोदांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या घटना त्याला अधिक भुरळ घालतात आणि त्याचे प्रतिबिंब त्याच्या नाटय़कृतींतून रंगभूमीवर पडलेले दिसते. आघाडीच्या ज्येष्ठ कलावंतांना घेऊन त्याने काही नाटय़कृती रंगभूमीवर सादर केल्या असल्या तरी नवनवीन कलाकारांना रंगभूमीसारखे समृद्ध व्यासपीठ उपलब्ध करून देणारा रंगकर्मी म्हणून संतोष पवारची विशेष ओळख आहे.     

संतोष पवारच्या नाटकांचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे त्याच्या नाटकात तो ‘सबकुछ संतोष पवार’ म्हणूनच पेश होत असतो. लोकनाटय़, लोकसंगीत यात प्रामुख्याने रमलेल्या संतोष पवारच्या नाटकात या सगळय़ाचे प्रतिबिंब अर्थातच पडते, पण केवळ विनोदी बाज असलेले लोककलात्मक नाटक करूनच तो थांबत नाही, तर त्यातून समाजात काहीतरी संदेश जाईल, याची पेरणी त्याने संहितेत मुळातच केलेली असते. ‘हौस माझी पुरवा’ हे नाटकही त्याला अपवाद नाही. उपहासात्मक शैलीचा वापर करत त्याने यातले नाटय़ रंगवले आहे.  

या नाटकातूनही त्याने समाजाला काही महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकाची कथा व संकल्पना अजय विचारे यांची आहे, तर लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य अशी चौरंगी भूमिका संतोष पवार याने सांभाळली आहे, परंतु हे सर्व करताना उगाच गांभीर्याचा किंवा समाजप्रबोधनाचा वसा वगैरे घेतल्याचा या मंडळींनी आव आणलेला नाही. कडू गोळी साखरेच्या वेष्टनात मुरवून ती समोरच्याच्या घशाखाली कशी उतरवता येईल, याकडे संतोष पवारने यात लक्ष पुरवले आहे. साहजिकच विनोदाचा पाया भक्कम करत त्यातून त्याने बरेच काही साध्य करण्याची ‘हौस’ या नाटकाच्या माध्यमातून भागवून घेतली आहे.  

या नाटकाचा फॉर्म वगनाटय़ाचा आहे. साहजिकच यात राजा, राणी वगैरे पात्रे आहेतच. अशाच एका राज्यातले संतू आणि अंशू हे दोघे मित्र थेट राजालाच सिंहासनावरून खेचून सत्ता हाती घेण्याचे स्वप्न पाहतात, पण हे सर्व करताना ही दुक्कल विविध कल्पना लढवते. यातूनच डान्सबारची अफलातून कल्पना त्यांच्या डोक्यात येते आणि मग सुरू होतो तो या जोडीचा राजासोबतचा पकडापकडीचा किंवा कुरघोडीचा खेळ! हा राजा वरकरणी तसा बावळट वगैरे वाटत असला तरी मुळात तो डोकेबाज आहे. त्यामुळे संतू आणि अंशूचे बेत पूर्णत्वास जातात का आणि ते कसे? याचा पट ‘हौस माझी पुरवा’ या नाटकात मांडला आहे.  

अर्थात, या कथासूत्रानुसार ही केवळ विनोद आणि मनोरंजनाच्या अनुषंगाने सांगितलेली गोष्ट वाटत असली तरी नाटकाचे ‘सांगणे’ त्याहून कितीतरी वेगळे आहे. वरवर पाहता हे नाटक सरळसरळ विनोदी छापाचे आहे असे वाटत असले तरी त्यात फार गांभीर्याने लोकशाही विषयक प्रश्नांची मांडणी केलेली आहे. अर्थातच या सगळय़ाला राजकारणाची पार्श्वभूमी आहेच आणि वर्तमान, प्रासंगिक घटनांची त्याला फोडणी देण्यात आली आहे. ‘दिग्दर्शक संतोष पवार’ या नात्याने त्याने नाटकाची बांधणी उत्तम केली आहेच, परंतु त्याचबरोबर नाटकातल्या कलावंतांना नाटय़ावकाशात मुक्तपणे संचार करण्याची संधीही त्याने दिली आहे.  

संतूच्या भूमिकेत स्वतः संतोष पवारच असल्याचा पुरेपूर फायदा या पात्राला अर्थातच झाला आहे. लेखक-दिग्दर्शकाला नक्की काय म्हणायचे आहे, ते संतूच्या तोंडून अधिक ठोसपणे बाहेर पडते. अंशूच्या भूमिकेत अभिजीत केळकर याने संतोष पवारला उत्तम साथ दिली आहे. अमोल सूर्यवंशी याने राजाचे पात्र अर्कचित्रात्मक शैलीत रंगवत नाटकात धमाल उडवली आहे. सोनू हे पात्र साकारणारी ऋचा मोडक तिच्या लाजवाब अदाकारीने लक्ष वेधून घेते. प्राप्ती बने यांच्या राणीनेही नाटकात धुमाकूळ घातला आहे. मंगल केंकरे यांना या नाटकातल्या पात्रांची वेशभूषा करण्यासाठी मोठा वाव मिळाला असून त्याचा त्यांनी उत्तम उपयोग करून घेतला आहे. हे नाटक विनोदी बाजाचे असले आणि यातला विनोद हा पुरेपूर आस्वाद घेण्याजोगा असला तरीही या नाटकाचे खोलात जाऊन जे काही सांगणे आहे, ते अधिक महत्त्वाचे आहे.                             

[email protected]