
मुंबईच्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस चणे-फुटाणे विकून सकाळी अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बघणाऱ्या संतोष साबळे याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाठबळ दिले. प्रामाणिकपणे प्रयत्न कर. तुला लागेल ती मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे संतोष साबळेचे मनोधैर्य उंचावले आहे.
सातारा जिह्यातील माण तालुक्यातील राजेवाडीचा संतोष साबळे रात्री दहा ते पहाटे पाच वेळेत चौपाटीवर चणे-फुटाणे विकून दिवसा मुंबई विद्यापीठात राज्यशास्त्र्ााचा अभ्यास करतो. स्पर्धा परीक्षेतून प्रशासकीय अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. साताऱ्यामधून मुंबईत येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संतोष साबळे याची बातमी मुंबईतल्या एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. संतोष खूप गरीब असून दिवसा तो कलिना येथे विद्यापीठाच्या ग्रंथालयात अभ्यास करतो आणि सायंकाळनंतर मरीन लाइन्स आणि गिरगाव चौपाटी येथे शेंगदाणे विकतो.संतोषच्या या जिद्दीच्या कहाणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतोषशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आणि मंत्रालयात भेटण्यासाठी येण्याचे आमंत्रण संतोषला दिले. मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण मिळताच संतोष साबळेने मंत्रालयात धाव घेतली.
शिक्षणाबद्दलच्या धडपडीचे कौतुक
मंत्रालयात संतोष येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संतोषची आस्थेने चौकशी केली. त्याची माहिती घेतानाच शिक्षणाच्या धडपडीचे कौतुक केले. ‘‘शिक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कर. त्यासाठी तुला लागेल ती मदत केली जाईल’’ असा दिलासा दिला. त्यासोबतच संतोषला कोणत्या प्रकारे मदत करता येईल याची माहिती घेऊन त्याला अभ्यासासाठी तातडीने सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले. भारावलेल्या संतोषने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः दखल घेऊन आपली आस्थेने चौकशी केल्याबद्दल आभार मानले. यातून प्रेरणा घेऊन आणखी जोमाने शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला.































































