
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर पश्चिम येथे 2010 मध्ये उभारण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला 30 एप्रिल 2022 रोजी एक तप पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आणि 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला विविधरंगी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 2800 चौरस फूट क्षेत्रफळावर विस्तारलेले हे तीन मजली दालन म्हणजे संग्रहालय आणि कलादालन यांचा संगम आहे.
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन इमारतीच्या तळघरात संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग घेतलेल्या नेत्यांची तैलचित्रे, महाराष्ट्रातील विविध नद्यांचे पाणी व माती असलेले कलश, भारतमातेची शिल्पाकृती, चंद्रावरील दगड (मून रॉक) मांडण्यात आले आहेत. तळमजल्यावर संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा संक्षिप्त इतिहास, छायाचित्रे, शिल्पचित्रे आणि माहितीफलक याद्वारे दर्शविण्यात आला आहे, तर पहिल्या मजल्यावर महाराष्ट्राचे आभूषण असलेले गडकिल्ले, लेणी, देवस्थाने, पर्यटनस्थळांची विहंगम दृश्य, लोककला, महाराष्ट्राची संस्कृती व प्राचीन शिल्पे दर्शविण्यात आली आहेत.



























































