
सामना प्रतिनिधी । पुणे
जिल्ह्यात या हंगामातील आतापर्यंत झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ९९ टक्के पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर (उसाशिवाय) क्षेत्र असून, यापैकी २ लाख ३० हजार ४५२ हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वाधिक ५० हजार ८१४ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे, तर कडधान्याच्या क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिल्याने उर्वरित पेरणीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
पुणे जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८२९.१० मि.मी. एवढे आहे. जून नैऋत्य मोसमी पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच हजेरी लावली. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्यांची घाई झाली. खरीप पिकांचे २ लाख ३० हजार ८२६ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत २ लाख ३० हजार ४५२ क्षेत्रावर पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये भात, खरीप ज्वारी, बाजरी, मका आणि इतर तृणधान्य यांची जवळपास ९४ हजार ५९६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत, तर ९० हजार ४४६ हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला, फुले आणि चारा या पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांच्या पश्चिम भागात भातपिकाचे क्षेत्र ७२ हजार ९५३ हेक्टर आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात केवळ ५ हजार ८२० क्षेत्रावर भातलावणी झाली. नंतर पाऊस रखडल्यामुळे पुनर्लावणी लांबली. आजअखेर ५० हजार ८१४ हेक्टरवर भातलावणी पूर्ण झाली आहे.
शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या भागांत बाजरीचे पीक घेतले जाते. सर्वसाधारण ४४ हजार ९४ हेक्टरवर बाजरी पीक घेतले जाते. आतापर्यंत २८ हजार ७९३ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र सरासरी ११ हजार १८३ हेक्टर असून, आतापर्यंत १२ हजार ५५३ हेक्टरवर मका पेरणी झाल्या आहे. जिल्ह्यात सरासरी ३ हजार ५५३ हेक्टरवर तुरीचे पीक घेतले जाते. यावर्षी या क्षेत्रात घट झाली असून, केवळ ७०६ हेक्टर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचे क्षेत्र सरासरी ५ हजार १९९ हेक्टर एवढे आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि बारामती या तालुक्यांत सोयाबीनचे उत्पन्न घेतले जाते. यावर्षी तब्बल १७ हजार ७८३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्याचबरोबर कांद्याचे क्षेत्रही वाढले असून, गतवर्षी २ हजार १५५ हेक्टरवर कांदा लागवड झाली. यावर्षी ती ३ हजार ७७४ हेक्टरवर पोहोचली आहे.
कडधान्यांच्या क्षेत्रात घट
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कडधान्याच्या क्षेत्रात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे, तर पेरणीच्या अंतिम टप्प्यात पावसाने ओढ दिल्याने त्यामध्ये जास्तीची घट झाली आहे. मुगाचे क्षेत्र ८ हजार ६९ हेक्टर असून, आतापर्यंत ५ हजार ९०० म्हणजेच ७३ टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात भुईमुगाचे क्षेत्र ४१ हजार ४०९ हेक्टर असून, आतापर्यंत ३३ टक्के म्हणजे १३ हजार ७०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली आहे. गतवर्षी २ हजार १७० हेक्टरवर तूर पेरणी करण्यात आली. यावर्षी केवळ ७०६ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.






























































