सारस्वती…मसालेदार

मीना आंबेरकर

बऱयाचदा मसाले हे जातीनिष्ठ असतात सारस्वती मसाला हा त्यापैकीच एक…

आपल्या जेवणात मसाल्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. किंबहुना मसाल्याशिवाय आपली खाद्यकृती पूर्ण होऊच शकत नाही. मसाल्याशिवाय जेवण म्हणजे मिळमिळीत जेवण ठरते. अर्थात हा मसाला हा नुसताच मसाला राहात नाही. आपल्या जातीधर्मानुसार मसाल्याचे स्वरूप बदलले. त्यातील घटकपदार्थ तेच असतात, परंतु मसाला तयार करताना त्यांचे प्रमाण बदलले असते. मग त्यातूनच ब्राह्मणी मसाला, घाटी मसाला, सीकेपी मसाला, सारस्वती मसाला अशी आपल्या जातीनुसार नावे लावून हे मसाले आपल्यासमोर येतात. त्यातीलच एक जातीनिष्ठ मसाला म्हणजेच सारस्वती मसाल्यासंबंधी आपण जाणून घेणार आहोत. पाहूया तर कसा तयार होतो हा मसाला, काय आहेत त्यातील घटकपदार्थ.

सारस्वती मसाला

साहित्य…१ चमचा जिरे, १ चमचा मिरी, १ चमचा नागकेशर, १ चमचा बांदियान, ४ हळकुंडे, १२ वेलची,१ चमचा शहाजिरे, १ चमचा लवंग,१ चमचा बडिशेप, १ चमचा दगडफूल, २ इंच दालचिनी, १ जायफळ, २००0 ग्रॅम धणे, अर्धा किलो लाल मिरची.

कृती…वरील सर्व साहित्य थोडे भाजून त्याची बारीक पूड करावी.या मसाल्यापासून तयार करण्यात येणाऱया

bambu-bhaji

काही खाद्यकृती

बांबू कोंबाची भाजी

साहित्य…बांबूचे कोवळे कोंब सोलून चोचवून बारीक चिरून  दोन वाटय़ा (पाण्यात ३-४ तास भिजवून ठेवावे), भिजवलेले काळे वाटाणे अर्धी वाटी, २ कांदे बारीक चिरून, चिरलेले आले, हळद, लाल तिखट १ चमचा, मसाला दीड चमचा, मीठ, गूळ चवीनुसार, ओले खोबरे १ वाटी, तेल.

कृती…ही भाजी चिरल्यावर ३-४ तास पाण्यात ठेवणे गरजेचे आहे. कारण ती तुरट असते. चिरलेली भाजी पाण्यातून निथळवून घ्या. वाटाणे, मीठ घालून उकडून घ्या. कढईत तेल घालून फोडणी करा. बारीक चिरलेला कांदा घालून तो व्यवस्थित परतून घ्या. त्यात आले घालून परता. मग त्यात निथळलेली भाजी, वाटाणे घालून हळद, लाल तिखट, मीठ, मसाला घालून मंद विस्तवावर शिजवा किंवा कुकरमध्ये एक शिटी काढा. वरून ओले खोबरे घाला. अत्यंत वेगळी व चवदार अशी ही भाजी आहे.

sarswat-food-1

सुरमई/हलवा कळपुरी

साहित्य…सुरमई, बांगडा, हलवा यापैकी कोणताही मासा मध्यम तुकडे करून, दोन मध्यम कांदे बारीक चिरून, ओले खोबरे अर्धी वाटी, आले, लसूण, हिरव्या मिरच्या बारी चिरून चवीनुसार, काळी मिरी ५-६ दाणे, लाल तिखट चवीनुसार, हळद, कोकम २-३, मसाला एक चमचा, खोबरेल तेल, मीठ.

कृती…खोबरे, काळी मिरी बारीक वाटा. शक्यतो पाणी वापरू नका. माशांच्या तुकडय़ांना स्वच्छ धुऊन हळद, मीठ, लाल तिखट लावून ठेवा. कढईत शक्यतो खोबरेल तेल सणसणीत गरम करून घ्या. त्यात आले, लसूण, मिरची परता. कांदा घाला आणि गुलाबी रंगावर परता. त्यावर खोबरे वाटण घालून जरा परता. थोडे पाणी घाला. मसाला घाला. नीट एकजीव करा. कोकम घाला. अंदाजे मीठ घालून माशांचे तुकडे घाला. व्यवस्थित ढवळा. झाकण ठेवून ५-७ मिनिटे शिजवा. यात तेल जरा अधिक घातले तर छान. हंगामात कोकमाऐवजी कैरी चालू शकते.

fry-prawns

मसालेदार सुकी कोलंबी

साहित्य…दोन वाटय़ा सुकी कोलंबी, दोन मध्यम कांदे चिरून, अर्धा इंच आले, २-३ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळय़ा, सर्व ओला मसाला बारीक वाटून अर्धा चमचा हळद, दोन चमचे मसाला, एक वाटी सुक्या खोबऱयाचा किस, दोन  टे. स्पून चिंचेचा कोळ, पाव वाटी तेल, मीठ.

कृती…सुकी कोलंबी साफ करावी. धुऊन कोरडी करावी. ओला मसाल्याची गोळी कोळंबीला चोळून ठेवावी. निम्मा कांदा व खोबरे तांबूस रंगावर भाजून वाटावे. उरलेला कांदा तापलेल्या तेलात घाला व परतावा. गुलाबी रंगाचा झाला की त्यात धुतलेली कोळंबी, हळद पूड व मीठ घालावे. दोन-तीन मिनिटे शिजवून मऊ झाली की वाटलेले कांदा-खोबरे, मसाला, चिंच किंवा हंगामात कैरी घालून वर झाकण ठेवून पाच मिनिटे शिजवावे. थोडा वेळ शिजल्यावर पाणी आटले की गॅस बंद करावा. ही मसालेदार कोलंबी भाकरी किंवा पावाबरोबर चवदार लागते.

fish-and-vege

तोंडाक

हा खास सारस्वती प्रकार आहे. यात मासे वापरले जातात किंवा फ्लॉवर व वाटाणे, बटाटे, नवलकोल यासारख्या भाज्या किंवा कडधान्येही वापरली जातात.

साहित्य…१ वाटी ओले खोबरे, एक कांदा, ४-५ लसूण पाकळय़ा, 2 चमचे धणे, ३-४ लाल मिरच्या, चिंचेचा कोळ १ चमचा, मिरी ८-१० दाणे, सारस्वती मसाला २ चमचे, तेल एक डाव.

कृती…तेलावर धणे, मिरच्या व मिरी भाजून घ्यावी. कांदा, लसूण व खोबरे भाजून घ्यावे. सर्व वस्तू वाटाव्यात. तेलावर एक कांदा बारीक चिरून टाकावा व तळसून घ्यावा. मग त्यावर वाटण टाकावे व ते चांगले तळसून घ्यावे. मग त्यात कोलंबी किंवा उकडलेले कडधान्य किंवा वेगळय़ा शिजवून घेतलेल्या भाज्या घालाव्यात. चवीनुसार मीठ व सारस्वती मसाला घालून नीट एकत्र करून एक वाफ काढावी.