सातारा लोकसभा पोट निवडणुकीच्या प्रचाराला आली रंगत

1298

भाजपाचे उदयनराजे भोसले विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील अशी सातारा लोकसभा पोट निवडणूक होणार असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या दोन उमेदवारांसह सात उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. उदयनराजे भोसले यांच्यावर त्यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारांवर निवडणूक लादल्याचा आरोप होत आहे तर सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी मी पक्षांतर केले असल्याचा खुलासा उदयनराजे यांनी केला आहे. उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांच्यामध्ये रंगतदार लढत होणार आहे. उदयनराजे भोसले यांना खासदारकी भाजपाच्या माध्यमातून टिकवावी लागणार आहे. तर साताऱ्याची राष्ट्रवादीची खासदारकी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न श्रीनिवास पाटील यांना करावा लागणार आहे.

1999 साली राष्ट्रवादीची निर्मिती झाल्यानंतर कराड लोकसभा मतदारसंघातून अचानकपणे शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आव्हान उभे केले होते. आपल्या खुमासदार वक्तृत्वशैलीमुळे श्रीनिवास पाटील यांनी कराड लोकसभा मतदार संघात बदल घडून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. यानंतर बरेच पुलाखालून पाणी गेले आणि पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर श्रीनिवास पाटील सिक्कीमचे राज्यपाल झाले. मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये कराड लोकसभा मतदार संघ रद्द झाल्यामुळे कराडला अद्यापपर्यंत खासदारकीची संधी मिळाली नव्हती या निमित्ताने मिळाली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सातारा लोकसभेचे प्रतिनिधित्व यापूर्वी केले आहे. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही संधी कराडला मिळाल्याचे श्रीनिवास पाटील आपल्या भाषणांमध्ये आवर्जुन सांगत आहेत. श्रीनिवास पाटील खासदारपदाचे उमेदवार आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमध्ये आमदारकीसाठी मैदानात आहेत. दोघे एकमेकांचा विजयासाठी प्रचार करीत असल्याचे सध्या चित्र आहे. श्रीनिवास पाटील सांगताहेत पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार करा ! तर पृथ्वीराज चव्हाण भाषणात सांगतात श्रीनिवास पाटीलांना खासदार करा!

सातारा लोकसभा मतदार संघामध्ये सातारा, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, पाटण या तालुक्यांचा  समावेश आहे. विधानसभेबरोबरच लोकसभा निवडणूक होत असल्याने लोकसभा उमेदवारांना प्रचाराचा मार्ग सोपा झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या