साताऱ्यात नाईट कर्फ्यू

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू केल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दहिवडी येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने आणखी दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज घेतला आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, महामार्गांवर असलेली हॉटेल, रेस्टॉरंट वगळून इतर हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 11 नंतर बंद ठेवण्यात यावी. लग्न समारंभाला वधूकडील 50 आणि वराकडील 50 अशा 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे, असे आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणाऱ्यांवर कारवाई करावी. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अचानक तपासणी करावी. जिल्ह्यात 71 टक्के लसीकरण झाले आहे. परंतु, यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना लस ही सुरक्षित असून, खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी. एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला, तर त्याच्या संपर्कातील लोक तपासणी करून घेत नाहीत, असे आढळल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करावा, असे आदेशही पालकमंत्री पाटील यांनी दिले.

नगर जिल्ह्यात रात्री दहा ते सकाळी पाचपर्यंत संचारबंदी

जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत खुली राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या