
मारायचे होते एकाला, पण मार बसला भलत्यालाच असा प्रकार सातारा येथील सदर बझारमध्ये घडला. एका महाविद्यालयीन युवकावर चार युवकांनी अचानक हल्ला करून त्याचे अपहरण केले. पण आपण मारत आहोत, तो युवक दुसराच कोणीतरी आहे, हे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा त्यांनी जिथून त्याला आणले होते, तिथे नेऊन सोडले. याप्रकरणी मारहाण अन् अपहरण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाविद्यालयीन युवकांमध्ये अलीकडे वादावादीचे प्रकार सातत्याने घडत असून, अचानक टोळक्याने येऊन हल्ले करण्याचे प्रकार घडू लागले आहेत. असाच काहीसा हा प्रकार सदर बझारमध्ये पाहायला मिळाला. रविराज सुरेश शेडगे (वय 20, रा. शेडगेवस्ती, संभाजीनगर, सातारा) हा महाविद्यालयीन युवक सर्किट हाऊसजवळ काही कामानिमित्त आला होता. दुचाकी लावून तो दुकानात जात असतानाच चार युवक दुचाकीवरून आले. त्यांनी काठी, दगडाने रविराजला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे युवक आपल्याला का मारत आहेत, हे त्याला समजेना. त्या युवकांनी त्याला गाडीवर बसवून त्याचे अपहरण केले. मोना स्कूल परिसरात नेऊन पुन्हा तेथे त्याला मारहाण करण्यात आली.
सरतेशेवटी त्या युवकांनी ‘तुझ्यासोबत असलेल्या मित्राला फोन लाव’, असे सांगितले. फोन केल्यानंतर संबंधित युवकाने ‘त्याचा काही संबंध नाही, त्याला काय तुम्ही मारताय’, असे म्हटल्यावर रविराजचे त्यांनी जिथून अपहरण केले होते, तिथे त्याला नेऊन सोडले. रविराज घरी गेल्यानंतर त्याने घरातल्यांना झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. त्यानंतर रविराजला घेऊन घरातले पोलीस ठाण्यात आले. रविराज चार युवकांपैकी एकालाच ओळखत होता. त्याचे नाव आकाश धोत्रे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी धोत्रेसह तीन अनोळखी युवकांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदार पवार हे अधिक तपास करीत आहेत.




























































