‘लाडकी बहीण योजने’चा राजकीय फायदा उठवण्यासाठी महायुतीने साताऱयात आयोजिलेल्या सेलिब्रेशनमुळे लाडक्या बहिणींबरोबरच लाडके भाऊ, सातारकर नागरिक आणि हजारो प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. अख्खे प्रशासन या इव्हेंटच्या नियोजनाला जुंपूनदेखील हे नियोजन फेल गेल्याने सर्वांच्याच वाटय़ाला मनस्ताप आला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात धुरळा उडाल्यामुळे महायुतीची झोप उडाली आहे. आता विधानसभेत काय होईल, या विचारानेच धास्तावलेल्या महायुतीने निवडणुका डोळ्यापुढे ठेवून ‘लाडकी बहीण’ योजना आणली आहे. त्याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी वचनपूर्ती कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये आज सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर कार्यक्रम आयोजित केला होता. या इव्हेंटच्या निमित्ताने तमाम सातारकरांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. जवळपास सर्वच घटकांना वेठीस धरल्यामुळे बहिणी, लाडके भाऊ यांच्यासह तमाम सातारकर व हजारो प्रवासी यांचे प्रचंड हाल झाले.
जागोजागी रंगरंगोटी आणि खड्डय़ांना मलमपट्टी
योजनेचा पुरेपूर राजकीय लाभ व्हावा म्हणून जाहिरातबाजीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. यानिमित्त दोन दिवसांपासून कार्यक्रमस्थळांबरोबरच संपूर्ण साताऱयात रस्तोरस्ती फ्लेक्स, कटआउट्स, स्वागतकमानी, झेंडे, जागोजागी रंगरंगोटी आणि रस्त्यावरील खड्डय़ांना तात्पुरती मलमपट्टी याचा नुसता दणकाच उडालेला दिसला. त्यामुळे कार्यक्रमाच्या औत्सुक्यापेक्षा राज्यकर्त्यांच्या हेतूचीच जनमानसात चर्चा झडली.
महिलांची दमछाक अन् उपासमार
z आज कार्यक्रमासाठी जिह्याच्या विविध भागांतून महिलांना आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या शेकडो बसेस बुक केल्या होत्या. कार्यक्रमाची वेळ साडेबाराची होती; पण प्रत्यक्षात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पावणेदोनच्या सुमारास आले. तथापि, कार्यक्रमास ग्रामीण भागातील महिलांना सकाळपासूनच आणले होते. निरनिराळ्या भागातून येणाऱया वाहनांच्या पार्ंकगची व्यवस्था शाहू स्टेडियम, जिल्हा परिषद मैदान, जुनी एमआयडीसी अशा विविध ठिकाणी केली होती. कार्यक्रम स्थळापासून लांब असलेल्या अशा ठिकाणांपासून महिलांना पायपीट करावी लागल्याने त्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यात कार्यक्रम सुरू होण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा तास दीड तास उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी वैतागून गेल्या. त्यात अन्नाची पाकिटे सर्वच महिलांना मिळू शकली नाहीत, त्यामुळे त्यांची उपासमार झाली.
‘प्रवासी फुल्ल; पण एसटी गुल’
z या कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक केल्यामुळे सातारा बसस्थानकासह जिह्यातील सर्वच बसस्थानकांमध्ये अघोषित संपासारखी परिस्थिती पाहायला मिळाली. जिह्यातील विविध आगारांच्या एसटी बसेस केवळ महिलांना आणण्यासाठी वापरल्या गेल्यामुळे ‘प्रवासी फुल्ल; पण एसटी गुल’ अशा अवस्थेला हजारो प्रवाशांना तोंड द्यावे लागल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. ग्रामीण भागात जाण्यासाठी तसेच तेथून येण्यासाठीही एसटी नसल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले.
एसटी अधिकाऱयांची अरेरावी
z शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते व अन्य पदाधिकाऱयांनी सातारा बसस्थानकात येऊन अडकून पडलेल्या शेकडो प्रवाशांसाठी बसेस सोडाव्यात, यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या पत्रकारांशी एसटीच्या अधिकाऱयांनी हुज्जत घातली, त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.