
कोयना धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात येणाऱया पाण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातील सध्याची पाणीपातळी 2126 फूट नऊ इंच (648.233 मीटर) इतकी असून, सध्या धरणाचा एकूण जलसाठा 67.20 टीएमसी (63.85 टक्के) झाला आहे.
सध्या धरणात 25,776 क्युसेक म्हणजेच दररोज सुमारे 2.22 टीएमसी इतका पाण्याचा प्रवाह होत आहे. या पार्श्वभूमीवर धरणाच्या पाणीपातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आज सायंकाळी धरणपायथ्यावरील विद्युतगृहाचे दुसरे युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. सध्या एक युनिटमधून 1050 क्युसेक विसर्ग सुरू असून, दुसरे युनिट सुरू झाल्यानंतर एकूण 2100 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. या अनुषंगाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, आज कोयना परिसरात 12 मि.मी., नवजा 9 मि.मी., महाबळेश्वरमध्ये 23 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंतचा एकूण पावसाचा आकडा अनुक्रमे ः कोयना 1986 मि.मी., नवजा 1788 आणि महाबळेश्वर 1858 मि.मी.