सातारसाठी गुड न्यूज! आणखी 70 डॉक्टरांमुळे आरोग्य यंत्रणा मजबूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात गेल्या पावणेदोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग आहे. मेडिकल कॉलेजसाठी ‘हिरवा कंदील’ मिळाला असतानाच सातारकरांसाठी दुसरी ‘गुड न्यूज’ आली आहे. सातारा जिल्ह्याला आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांच्या प्रयत्नांतून आणखी  70 डॉक्टरांची टीम मिळाली आहे. आतापर्यंत जिल्ह्याला 155 डॉक्टर मिळाल्याने आरोग्य यंत्रणा मजबूत होण्यास मदत झाली आहे. सध्या कोरोनाबाधित व मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह कर्मचाऱ्य़ांच्या जागा रिक्त आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

साताऱ्य़ाचे सुपुत्र डॉ. संजोग कदम यांनी आरोग्य उपसंचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्य़ांकडे सातारा जिल्ह्यात वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत आग्रह धरला. आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी सातारा जिल्ह्याला सध्याच्या परिस्थितीत 70 डॉक्टर्स दिले असून, हे सर्व डॉक्टर 15 दिवसांत कार्यभार स्वीकारणार आहेत. या डॉक्टरांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे.