
’देशातील सध्याचे वातावरण समाजात, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारे आहे. हे वातावरण माझ्या परिचयाचे नाही. आम्ही जो भारत बघत वाढलो, ते हे वातावरण नाही. रोज सकाळी उठून कोणीतरी आम्हाला हिंदू असल्याची आठवण करून देत असते. मग 2014 च्या आधी आम्ही हिंदू नव्हतो का,’ असा भेदक सवाल ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी केला आहे.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राज्यातील व देशातील सध्याच्या वातावरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पुण्यात मी ज्या ठिकाणी वाढलो, तिथे सर्व प्रकारच्या विचारसरणीचे लोक आमच्या आजूबाजूला राहायचे. त्यामुळे हा संघाचा, हा स्काऊटचा, हा सेवा दलाचा, हा काँग्रेसचा हे माहीत होतं, पण तरीही सर्वांमध्ये मेळ होता. एक प्रकारची देवाणघेवाण होती. खटकणाया गोष्टी तोंडावर सांगू शकत होतो. एकमेकांच्या घरी येणं-जाणं होतं. असं वातावरण होते. आता ते दिसत नाही,’ अशी खंत आळेकर यांनी व्यक्त केली.
’आम्ही हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणूनच जगतोय आणि हिंदू म्हणूनच मरणार आहोत. मग रोज सकाळी तुम्ही हिंदू आहात याची आठवण आम्हाला का करून दिली जाते?’
आणखी किती वर्षे हे सुरू राहणार माहीत नाही!
’सध्या जे काही चालले आहे, त्याबद्दल भूमिका घेऊन कोणी उभे राहत नाही हे दुर्दैव आहे. पूर्वी काही खुट्ट झालं की लोक रस्त्यावर उतरायचे. सभा व्हायच्या, चर्चासत्रे व्हायची. आता तसे होत नाही. काही होत असेल तर ते तुटक होते. आपण प्रत्यक्ष कनेक्टेड राहिलेलो नाही. सगळे इंटरनेटवर सुरू आहे. एक निरर्थकता दाटून राहिल्यासारखे वाटते. याकडे कसे पाहायचे हेच कळत नाही. मी गोंधळून गेलो आहे. हतबलता वाटते. इथून पुढे काय होणार? आणखी किती वर्षे हे सुरू राहणार माहीत नाही,’ असेही आळेकर म्हणाले.





























































