
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मकोका लावण्यात आलेला आरोपी कृष्णा आंधळे हा तीन वेळा त्याच्या गावी येऊन गेल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट धनंजय देशमुख यांनी केला. आम्हाला मिळालेली ही माहिती तपास यंत्रणांना देण्यात आली असून, कृष्णा गावात येऊन गेल्याचे सीआयडीनेही मान्य केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
आज पत्रकारांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा हा कर्नाटकात ऊसतोडीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथेही पोलिसांनी धडक मारली होती. कृष्णा या वर्षभरात किमान तीन वेळा गावी येऊन गेला, अशी आमची माहिती आहे. कृष्णाच्या लवकरात लवकर मुसक्या आवळाव्यात, अशी मागणीही देशमुख यांनी केली.
लवकरात लवकर खटला मार्गी लागावा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक लॅपटॉप फॉरेन्सिक लॅबला देण्यात आला होता, त्यातील सर्व डेटा मिळाला असून, पुढील सुनावणीत सर्व साक्षीदारांची यादी देण्यात येणार आहे. आरोपपत्रच दाखल होऊ नये असा प्रयत्न आरोपींचा होता. परंतु खटला आता साक्षीपुराव्याला आला आहे. लवकर हा खटला मार्गी लागावा, अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली. 6 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत आम्ही आरोपींची संपत्ती जप्त करण्याची मागणी करणार आहोत, असे धनंजय देशमुख म्हणाले.





























































