मोबाईलवर दुरी अन् पोलिसांच्या हातावर तुरी, मटकावाल्यांचा ‘जिगरबाज’ धंदा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

खेड तालुक्यातील मटका माराहाण प्रकरण आता पेटले असून जिल्ह्यातील मटका व्यवसायिकांची घटका समीप आली आहे. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी मोबाईलवर आकडा धंदा चालवत पोलिसांच्या हातावर तुरी आणि मोबाईलवर दुरी असा मटकेवाल्यांचा “जिगरबाज” खेळ सुरु आहे.

रत्नागिरी शहर आणि परिसरात ‘जिगर’ नावाच्या मटका व्यवसायिकाची जोरात चर्चा सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी खेड येथील पत्रकारांना मटका व्यवसायिकांनी माराहाण केली होती. माराहाणीनंतर सर्वच पत्रकार संघटनांनी आवाज उठवला. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आता 20 जून रोजी पत्रकार आंदोलन छेडणार आहेत. दरम्यान, मंगळवारी काही ठिकाणी पत्रकारांनी काळ्याफिती लावून आंदोलने छेडली. अगदी ‘खेडपासून खेडशी’ पर्यंत हा मटक्याचा जिगरबाज धंद्याची पाळेमुळे उखडून टाकावीत अशी मागणी नागरिक करत आहेत.

मटका व्यवसाय राजरोसपणे सुरु असून जणू काही आपण रोजगार निर्माण करत असल्याच्या अर्विभावात हे मटक्यातील “बिग बी” वावरत आहेत. अशा मटक्यातील “बिग बी”चा बिमोड करण्याचे मोठे जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर आहे.खरतर स्थानिक पातळीवरील पोलिसच मटका धंद्यावर कारवाई का करत नाहीत हा यक्ष प्रश्न नागरिकांना पडला आहे. खेड येथील प्रकरणानंतर मटका धंदा रडारवर आला आहे.