सात्त्विक-चिराग जोडी पुन्हा टॉप-10 मध्ये

सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या हिंदुस्थानच्या स्टार जोडीने पुन्हा एकदा जागतिक बॅडमिंटन संघटनेच्या (बीडब्ल्यूएफ) ताज्या क्रमवारीत पुरुष दुहेरीच्या ‘टॉप-10’मध्ये स्थान मिळविले.

गतवर्षी ‘चायना ओपन’च्या उपांत्य फेरीत धडक दिल्याने त्यांना क्रमवारीत तीन गुणांचा फायदा मिळाला. या माजी ‘नंबर वन’ जोडीने आता दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सात्त्विक-चिराग जोडीला ‘चायना ओपन’च्या उपांत्य लढतीत आरोन चिया व सोह वुई यिक या मलेशियन जोडीने 21-13, 21-17 असे हरविले होते. यंदाच्या ‘बीडब्ल्यूएफ’ हंगामातील सात्त्विक-चिराग जोडीचा हा तिसरा उपांत्य सामना होता. याआधी या हिंदुस्थानी जोडीने ‘सिंगापूर ओपन’ व ‘इंडिया ओपन’च्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला होता.

सिंधू 15 व्या स्थानी कायम

नव्या दमाच्या उन्नती हुडाने गतआठवडय़ात दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र तरीही सिंधूने महिला एकेरीत आपले 15वे स्थान कायम राखले; पण उन्नतीने 31 व्या स्थानी झेप घेतली आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन 17व्या स्थानी पोहोचला असून एचएस प्रणॉयनेही एका स्थानाने प्रगती करताना 33 वा क्रमांक मिळविला आहे.