
>> वैद्य सत्यव्रत नानल
अपेंडिक्स म्हणजे छोटे आतडे मोठय़ा आतडय़ाला जिथे जोडलेले असते त्या मोठय़ा आतडय़ाच्या भागाला आयुर्वेदात ‘उंडुक’ म्हणतात. या भागाला एक छोटी शेपटीसदृश रचना असते. त्या शेपटीला आधुनिक वैद्यकाने ‘अपेंडिक्स’ असे नाव ठेवले आहे. ‘अपेंडिसायटिस’ म्हणजे सामान्यतः अपेंडिक्सला सूज येणे.
‘अपेंडिसायटिस’मध्ये दोन प्रकार संभवतात – सूज येणे आणि सूज खूप वाढल्याने ताण सहन न होऊन अपेंडिक्स फुटणे.
अ) सूज येणेः हा पहिला प्रकार दोन अवस्थांमध्ये दिसतो.
(1) सूज येण्याची जुनी सवय निर्माण झालेली असणे. यात पोटात उजव्या कुशीत खालच्या बाजूला हलके दुखणे कधी कधी होत राहते. तात्पुरत्या उपायांनी दुखणे थांबते किंवा दुखणे सहन होण्याइतपत असल्याने त्याकडे दुर्लक्षही होऊ शकते आणि त्याने आपल्या नकळत रोग वाढत जातो. याला आधुनिकात ‘क्रॉनिक अपेंडिसायटिस’ म्हणतात.
(2) याचीच दुसरी अवस्था म्हणजे काही निमित्ताने आधीपासून वाढत असलेली सूज वेळेच्या आधीच पटकन खूप वाढणे आणि असह्य वेदना सुरू होणे.
आ) अपेंडिक्स फुटणेः सूज येणे ही प्रक्रिया आधी झालेली नसेल तर आकस्मिक कारणांनी ती काही वेळात पूर्ण होऊन झपाटय़ाने वाढणे झाले तर ताण सहन न होणे आणि अपेंडिक्स फुटणे ही तिसरी अवस्था निर्माण होते. ही आत्ययिक (इमर्जन्सी) अवस्था असते आणि यामध्ये रोग्याला वेदना सहन होत नाहीत. अपेंडिक्स फुटल्याने आतडय़ातील सर्व मळबा पोटात पसरून रुग्ण दगावू शकतो. अशा वेळी ऑपरेशनला पर्याय नसतो. आधी वर्णन केलेल्या उंडुकात सूज येणेच्या दोन्ही प्रकारांत जिथे अपेंडिक्स फुटलेले नसते, तिथे आयुर्वेदीय उपचार उत्तम काम करतात.
आयुर्वेदानुसार कारणे –
l आयुर्वेदानुसार उंडुकाची निर्मिती होताना सर्वात जास्त जोर रक्त, पित्त यांचा असतो. त्यामुळे छोटय़ा छोटय़ा कारणांनी या भागात रक्त आणि पित्ताचा जोर पटकन वाढू शकतो. ज्याने त्रास पटकन वाढतात.
l अर्धवट पचन हेही या त्रासामागे प्रमुख कारण आहे. छोटय़ा आतडय़ात होणारे पचन अर्धवट झाले असेल तर तिथून मोठय़ा आतडय़ात आलेल्या अर्धपाचित अन्नात पित्ताचा जोर जास्त राहतो. त्यामुळे मोठय़ा आतडय़ाच्या आतील त्वचेवर वाईट परिणाम व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आतडय़ाला हळूहळू सूज यायला सुरुवात होते.
l इन्फेक्शन हा एक प्रकार आधुनिक वैद्यकाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे उंडुकातून पुढे जाणारे आणि त्याला असलेल्या अपेंडिक्समध्ये जाणारे, अडकणारे अपाचित अन्नच बनू नये यासाठी पचन सुधारणेकडे आयुर्वेदाचा कल जास्त असतो.
आहारातील कारणे –
(अपथ्याचे / न खाण्याचे पदार्थ/हे खाणे टाळावे.)
l भरपूर तेल आणि तिखट वापरून केलेली तर्री, छोटी वांगी, दही, केळी, सीताफळ, लाल भोपळा, मोड आलेली कडधान्ये, फ्राय केलेले पदार्थ (मासे, वडे, भजी, समोसे, शेव, फरसाण, गाठीया, फाफडे, जिलेबी इत्यादी सर्व वारंवार, नियमित खाणे.)
l पोटात जंत होण्यासाठी कारण असलेले भरपूर गोड खाणे.
l भरपूर किंवा वारंवार मशरूम, शेल फिश म्हणजे समुद्री जीव (कोळंबी, शंख, शिंपले, खेकडे इत्यादी) खाण्याने अपचनही लवकर होते, कफही होतो आणि पोटात जंतही.
l शिळे अन्न प्रकार, बेकरीमधील आंबवलेले पचायला जड प्रकार (बटर, टोस्ट, पाव, पेस्ट्री, क्रीम केक, क्रीम बिस्कीट, पॅटिस इत्यादी.)
l दुधाच्या पदार्थांबरोबर ताजी फळे (स्ट्रॉबेरी बासुंदी, सीताफळ कुल्फी, पायनॅपल मिल्क शेक इत्यादी), पालेभाज्या, मांसाहार, मूग (खिचडी, दूध), मका (कॉर्नफ्लेक्स-दूध), मिठाचे किंवा आंबवलेले पदार्थ (दूध-बिस्कीट, ओरियो मिल्क शेक इत्यादी.)
हे सर्व प्रकार म्हणजे शरीरात सूज निर्माण करणे, टिकवणे, रक्त पुरवठा खंडित करणे यांना वाढवतात.
























































