हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू, सौदीत भीषण अपघात

सौदी अरबमध्ये भीषण अपघातानंतर एका प्रवासी बसला लागलेल्या आगीत होरपळून हिंदुस्थानच्या 45 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 10 चिमुकल्यांसह 18 महिला व 17 पुरुषांचा समावेश आहे. हे सगळे तेलंगणाचे रहिवाशी आहेत.

हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी पहाटे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस मक्केहून मदिनाला निघाली होती. मदिनापासून 160 किमी अंतरावरील मुहरासजवळ असताना डिझेल टँकर बसला धडकला. ही धडक इतकी भयंकर होती की, त्यानंतर स्पह्ट झाला आणि काही क्षणांतच बस जळून खाक झाली. बसमध्ये एकूण 46 प्रवासी होते. झोपेत असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. बसचालक जखमी झाला असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

जेद्दाहमध्ये मदत कक्ष

अपघाताच्या पार्श्वभूमीवर जेद्दाह येथील हिंदुस्थानी दूतावासात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष 24 तास कार्यरत राहणार असून हेल्पलाइन क्रमांक 80024 40003 असा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे.