Israel Iran War – इराणचा सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला; रास तनुरा रिफायनरी बंद, कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अरामकोवर इराणने भीषण ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेचा आणि खबरदारीचा उपाय म्हणून अरामकोने आपली अत्यंत महत्त्वाची असलेली ‘रास तनुरा’ रिफायनरी तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद जागतिक बाजारपेठेवर उमटले असून, ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत 9.32 टक्क्यांनी मोठी वाढ झाली आहे. ही रिफायनरी सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या ऊर्जा केंद्रांपैकी एक असून, हल्ल्यानंतर येथील प्रक्रिया संकुलात आग लागली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग आता आटोक्यात आली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अरामको प्रशासनाने परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले असले तरी, या हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराण आणि इस्त्रायल, अमेरिका संघर्षाची तीव्रता वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. हा जलमार्ग जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण जगातील एकूण कच्च्या तेलाच्या वापरापैकी जास्त तेल याच मार्गावरून वाहून नेले जाते. जरी इराणने हा मार्ग अधिकृतपणे बंद केला नसला, तरी युद्धजन्य परिस्थितीमुळे जहाज मालकांनी स्वतःहून हा मार्ग टाळण्यास सुरुवात केली आहे.

हा संघर्ष शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील विविध ठिकाणांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अधिक तीव्र झाला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर तेहरानने इस्रायलमधील अमेरिकन तळांसह सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि बहरीन यांसारख्या शेजारील देशांतील महत्त्वाच्या ठिकाणांवर निशाणा साधत आहेत.  इराण युद्धाचा हा नवा टप्पा जागतिक तेल बाजारपेठेसाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे.