अहिल्यानगर जिल्ह्यातील सौंदाळा गावचा जातमुक्तीचा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज सर्वत्र भेदभाव निर्माण करणारे, द्वेषाचे, भिती दाखवण्याचे वातावरण जाणिवपूर्वक निर्माण केले जात आहे. जातीपातीच्या, धर्माच्या भिंती उभ्या करून माणसा-माणसातील प्रेम, जिव्हाळा संपवला जात आहे. सर्वत्र द्वेषाची भावना वाढीस जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एक वेगळा आदर्श घालून दिलेला आहे, हा आदर्श राज्यात सर्वदूर पोहचला पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील जातमुक्त सौंदाळा गावाला भेट देऊन गावकऱ्यांचे अभिनंदन करत संवाद साधला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाला भिती घालत आहेत, युद्धाची धमकी देत आहे. देशात व राज्यातही भेद निर्माण करणारे, भितीचे वातावरण पसरवणारे अनेक प्रवाह आहेत. अशा वातावरणात सौंदाळा गावाने जातमुक्तीचा ठराव करून ‘डरो मत’ चा संदेश दिला आहे. खरे तर जाता जात नाही ती जात, धर्म बदलता येतो पण जात बदलता येत नाही. मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा म्हटले की आधी जात लिहावी लागते. आज जातीपातीच्या भिंती अधिक गडद होऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली व त्यानंतर सामाजिक वातावरण बिघडले. आपल्याच जातीच्या दुकानातून किराणा घ्या, इथपासून किर्तनकारही आपल्याच जातीचा बोलवावा इथपर्यंत हे लोण गेले, अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन सद्भावना पदयात्रा काढत समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

सौंदाळा गावाने एकता, समता आणि बंधुभाव यांचा संदेश देत खूप मोठे पाऊल टाकले असून आज राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती आहे. गाडगेबाबा हे स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक न्याय आणि मानवतेचे प्रबोधन करणारे थोर संत होते. त्यांच्या विचारांशी पूर्णपणे जुळणारा हा निर्णय म्हणावा लागेल. अज्ञान, भेदभाव आणि अस्वच्छतेविरुद्ध लढणाऱ्या गाडगे बाबांच्या मार्गावरच सौंदाळा गाव चालत आहे. गढूळ झालेल्या वातावरणात सौंदाळा गावाने तुरटी फिरवण्याचे काम केले आहे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.