
संवेदनशील कवी आणि प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम तथा सौमित्र यांना मुंबईतील घर वाचवण्यासाठी समाजमाध्यमातून आवाज उठवावा लागला आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली सौमित्र हे राहत असलेल्या इमारतीत एसआरए प्रकल्प घुसवण्याचे प्रयत्न सुरू असून त्यावर बोट ठेवत ‘आम्हाला डोक्यावरचे छप्पर गमावून संक्रमण शिबिरात खितपत पडावे लागेल’, अशी भीतीच सौमित्र यांनी व्यक्त केली आहे.
अंधेरी चकाला येथे चरतसिंग कॉलनी रोडवर मोक्याच्या जागी हवा महल इमारतीत सौमित्र यांचा फ्लॅट आहे. या इमारतीत 24 सभासद असून सध्या पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. त्यात चक्क एसआरएखाली इमारतीचा पुनर्विकास करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सौमित्र यांनी केला आहे.
प्रकल्प सल्लागार आणि विकासकाचे संगनमत असून कमिटीचे अज्ञान हेरत त्यांनी डाव साधला आहे. त्यांनी सदस्यांचे बहुमत मिळवले असून लोक स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारायला निघाले आहेत. एसआरए म्हणून इमारतीचा विकास झाला तर आमची राहती घरे संक्रमण शिबिरं होण्याची भीती सौमित्र यांनी व्यक्त केली आहे. यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. एका कलावंताचे घर वाचवण्यासाठी रसिक जनतेनेही साथ द्यावी, अशी साद सौमित्र यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून घातली आहे.
पुनर्विकासाला विरोध असल्याचे भासवून मला एकटं पाडण्यात आलं आहे. मला व अन्य एका सदस्याला वगळून इतर सदस्यांचा वेगळा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला. सगळी माहिती लपवली जात आहे. बहिष्कृत करण्याचा हा प्रकार असून हा ‘शहरी अॅट्रॉसिटी’च आहे, असे सौमित्र म्हणाले.
100 या प्रकल्पाच्या अर्ज प्रक्रियेचे काम करत असलेले अॅड. प्रदीप कदम यांनी सोसायटीच्या बैठकीत अनेक खटकणाऱ्या बाबी निदर्शनास आणून दिल्या व ते प्रक्रियेतून बाहेर पडले. तरीही प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप अन्य एका सदस्याने केला.