
>> प्रतीक राजूरकर
हिंदुस्थानात बचतीचे महत्त्व प्राचीन आहे. संत वाङ्मयात याबाबत अनेक अभंगसुद्धा आहेत. कुठलीही पदवी अथवा विशेष शिक्षण नसतानादेखील संतांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. बचत धन संचय हे प्राचीन काळापासून हिंदुस्थानचे सूत्र राहिले आहे. गेल्या काही दशकांत यात बरीच उलथापालथ बघायला मिळते आहे. बचतीच्या पद्धतीचे निकष मोठय़ा प्रमाणात बदलले. गरजेपुरती बचत आता कालबाह्य झाली. कारण गरजांच्या कक्षा बदलत्या जीवनशैलीत अधिकच व्यापक झाल्या आहेत.
जागतिक बचत दिन ही संकल्पना व्यापक स्वरूपात अस्तित्वात आली ती 30 ऑक्टोबर 1924 साली. त्या अगोदर 1921 साली अमेरिका, स्पेन येथील बँकांनी तो साजरा करण्यास सुरुवात केली होती. जगाला बँकेतील बचतीचे महत्त्व कळावे म्हणून जगभरात हा दिवस 31 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. ऑक्टोबर 1924 साली इटली मिलान येथे आंतराष्ट्रीय बँक बचत काँग्रेस (वर्ल्ड सोसायटी ऑफ सेविंग बँक) निमित्ताने या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ प्राप्त झाले. इटलीचे प्राध्यापक फिलिपो रॅविझ्झा यांनी बचत दिन जाहीर केला. याप्रसंगी झालेल्या ठरावात बचतीचे महत्त्व विषद करून एक दिवस बचतीसाठी समर्पित करण्याचे नमूद होते. उपस्थित 29 देशांच्या प्रतिनिधींनी बँक बचतीचे महत्त्व जगाला कळावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला. दुसऱया महायुद्धानंतर 1955 ते 1970 यादरम्यान जागतिक बचत दिवसाच्या लोकप्रियतेत मोठय़ा प्रमाणात वृद्धी झाली. आज जगभरात मोठय़ा प्रमाणात हा दिवस साजरा करण्याची प्रथा प्रचलित आहे. हिंदुस्थानात 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाल्याने 30 ऑक्टोबर रोजी बचत दिवस साजरा करण्यात येऊ लागला. बहुतांशी देशांत 31 ऑक्टोबर या दिवशीच हा साजरा केला जातो. काही देशात 31 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्यास इतर दिवशी साजरा होतो. आज जगातील 80 देश मोठय़ा प्रमाणात जागतिक बचत दिवस साजरा करत आहेत.
हिंदुस्थानात बचतीचे महत्त्व प्राचीन आहे. संत वाङ्मयात याबाबत अनेक अभंगसुद्धा आहेत. कुठलीही पदवी अथवा विशेष शिक्षण नसतानादेखील संतांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले आहे. व्यय-अपव्यय न करणे हे बचतीचे सूत्र संत सांगतात. बचतीसाठी काय करावे यापेक्षा संतांची शिकवण काय करू नये म्हणजे बचत होईल सांगणारी आहेत. समर्थ रामदासांनी वेगळ्या पद्धतीने बचतीचा मार्ग दाखवलेला आहे.
लेकुरे उदंड जाहली। तो ते लक्ष्मी निघून गेली।।
बापुडे भिकेला लागली। काही खाया मिळेना।।
पुढे समर्थांनी अगदी मोजक्या शब्दांत अर्थ आणि परमार्थाचा उपदेश केला आहे.
येहलोकींचा संचितार्थ । परलोकींचा परमार्थ । संचितेंविण वेर्थ । जीत मेले ।।
दैनंदिन व्यवहारासाठी धनसंचय तर पारमार्थिक धन हे पुण्य संचयाने प्राप्त होते. ही बचत न करणारा मनुष्य जिवंत असूनही मेल्यासारखाच असल्याचे समर्थ उपदेश करतात.
हिंदू संस्कृतीत बचत, संचयाचे महत्त्व केवळ आर्थिक विषयापुरते मर्यादित नाही. निसर्ग, आरोग्य, अन्न, नाती, ज्ञान, विज्ञान अशा विविध विषयांवर हिंदू धर्मात मार्गदर्शन केल्या गेले आहे. दिवाळी हा सण लक्ष्मीच्या उपासनेचा आहे. धन हे लक्ष्मीस्वरूप मानले गेले आहे. ज्ञान सरस्वती स्वरूप आहे. धन्वंतरी आरोग्य, भाऊबीज नात्यातील गोडवा वाढवणारी म्हणून मान्यता आहे. मकरसंक्रांत हे विज्ञानाचे प्रतीक तर ऋतूप्रमाणे येणारे सण हे निसर्गाचे महत्त्व दर्शविणारे आहेत. मानवी जीवनाला समृद्ध करणाऱया प्रत्येक क्षेत्राला हिंदू धर्मात देवत्व बहाल करण्यात आले आहे. म्हणूनच हिंदू धर्म ही मानवाच्या जगण्याची आदर्श पद्धती आहे.
जागतिकीकरणाच्या काळात अनेकांचा बचतीचा कल गुंतवणुकीकडे वळता झाला आहे. म्युच्युअल फंड, बॉण्ड, मालमत्ता, यांसारखे अनेक पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. अर्थशास्त्रात बचत आणि गुंतवणूक या दोन वेगळ्या संज्ञा आहेत, परंतु बचतीची पुढची पायरी म्हणून गुंतवणुकीकडे नक्कीच बघितले जाऊ लागले. योग्य गुंतवणूक करणाऱयांची बचतसुद्धा चांगली परतफेड करणारी ठरते आहे. दुसरीकडे बचतीला खर्चाकडे नेणारे पर्याय म्हणून क्रेडिट कार्ड, ऑनलाइन खरेदी हेसुद्धा पर्याय उपलब्ध झाले आहेत. बचतीचे महत्व सर्वश्रुत आहे. बँका या आजवर बचतीसाठी सर्वात सोपे आणि उपयुक्त माध्यम म्हणून बघितले जाऊ लागले. गेल्या महिन्यात 11 हजार कोटींच्या बचत ठेवी असलेल्या पीएमसी बँकेवर आलेल्या निर्बंधांनी नागरिकांच्या बँकांवरील विश्वासाला काही प्रमाणात तडा गेला आहे. अनेकांची बचत अडकून पडल्याने खातेदारांना मोठय़ा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. रिझर्व्ह बँकेने याबाबत 27 तारखेपर्यंत महत्त्वाचा खुलासा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एकीकडे जागतिक बचत दिवस साजरा होणाऱया आठवडय़ात खातेदारांना दिलासा देणारी बातमी यावी अशीच सगळ्यांची इच्छा आहे. तसे न झाल्यास ‘बँक बचत दिवस’ प्रथा सुरू करण्याची नामुष्की येईल इतका रोष खातेदारांत दिसून येतो आहे.
बचत धन संचय हे प्राचीन काळापासून हिंदुस्थानचे सूत्र राहिले आहे. गेल्या काही दशकांत यात बरीच उलथापालथ बघायला मिळते आहे. बचतीच्या पद्धतीचे निकष मोठय़ा प्रमाणात बदलले. गरजेपुरती बचत आता कालबाह्य झाली. कारण गरजांच्या कक्षा बदलत्या जीवनशैलीत अधिकच व्यापक झाल्या आहेत. त्यामुळे कालानुरूप बदल स्वाभाविकच म्हणावा लागेल. शिवाय बदल सृष्टीचा नियमच आहे. त्यामुळे कुठलेही एक क्षेत्र त्याला अपवाद ठरू शकणारे नाही. कर्ज काढून तीर्थयात्रा करू नये म्हणून शिकवण दिली जायची, परंतु हल्ली बँकाच यात्रेसाठी कर्ज उपलब्ध करून देताहेत, मात्र शेतकऱयांना कर्ज देण्यास टाळाटाळ केली जाते. एका खासगी संस्थेच्या पाहणीत 67 टक्के हिंदुस्थानातील नागरिक कर्ज घेण्यास तयार आहेत, तर दुसरीकडे देशात बचतीचा कल कमी असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. आपल्या देशात बचतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र हिंदुस्थानात अनेकांचा प्रवास आता बचतीकडून अनावश्यक कर्जाकडे वळल्याचे चित्र आहे.



























































