
घर खरेदीसाठी दिवाळीचा शुभमुहूर्त काढला असाल तर जरा सावधान! घर घ्या पण तत्पूर्वी गृहकर्ज घेणे किती महागात पडेल याचा हिशेब मात्र काढा. विशेष करून स्टेट बँकेकडून घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करणाऱया ग्राहकांसाठी हा सल्ला आहे. स्टेट बँकेने गृहकर्जावर प्रोसेसिंग फी घेण्याचा निर्णय घेऊन ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना झटका दिला आहे. ही फी दहा हजार रुपयांपासून तीस हजार रुपयांपर्यंत असेल.
एसबीआयने काही दिवसांपूर्वी बचत आणि मुदतठेवींवरील व्याजदर कमी केले होते. आता गृहकर्जाकडे बँकेने मोर्चा वळवला आहे. केवळ गृहकर्जच नव्हे तर टॉप अप प्लॅन्स, कॉर्पोरेट आणि बिल्डरांना दिल्या जाणाऱया कर्जावरही एसबीआय प्रोसेसिंग फी घेणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर सर्वच बँका व्याजदर कमी करत आहेत. गृहकर्जावर प्रोसेसिंग फी माफ करण्याची एसबीआयची ऑफर 16 ऑक्टोबरला संपत आहे.




























































